रत्नागिरी : रत्नागिरी शहरात अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत, रत्नागिरी शहर पोलिसांनी एका संशयित व्यक्तीकडून सुमारे ३१,००० रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून, त्याला अटक केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांनी दिलेल्या सूचनेनुसार, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पथक ३ ऑगस्ट, २०२५ रोजी रात्री गस्त घालत होते. कोकणनगर ते प्रशांत नगर परिसरात एका दुचाकीवर बसलेला एक इसम संशयास्पद हालचाली करताना दिसला.पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडील निळ्या रंगाच्या प्लॅस्टिक पिशवीत काळपट हिरवट रंगाचा, उग्र वासाचा गांजा आढळला. या गांजाचे वजन ६९५.५ ग्रॅम असून त्याची किंमत ३१,००० रुपये आहे. पोलिसांनी आरोपी सत्यजित सदाशिव जाधव (वय ३३, रा. रत्नागिरी) याच्याकडील गांजा, ६५,००० रुपये किमतीची ज्युपिटर गाडी आणि इतर साहित्य असा एकूण ९६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपीविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक सागर शिंदे यांच्यासह सहायक पोलिस फौजदार दीपक साळवी, पोलिस हवालदार पंकज पडेलकर, आशिष भालेकर, प्रशांत पाटील, अमोल भोसले, पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे यांनी केली



