रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील राकेश जंगम यांच्या खूनप्रकरणी तपासात दाखवण्यात आलेल्या निष्काळजीपणाबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आल्यानंतर आणखीन दोन पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे. सोमवारी त्यांच्याबाबतचा अंतिम अहवाल तयार होणार असून त्यांच्यावर कारवाई होणार की नाही हे त्यातून स्पष्ट होणार आहे. पूर्णगड सागरी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्याकडे जयगड पोलीस स्थानकाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. जयगड मधील राकेश जंगम गतवर्षी बेपत्ता झाला. वर्षभर त्याचा काहीच पत्ता लागला नाही ज्यावेळी बेपत्ता भक्ती मयेकर शोध सुरू होता तेव्हा त्या तपासात दुर्वास पाटील यांनी राकेश जंगम यांचा खुनाची कबूल दिली. राकेश बेपत्ता झाला तेव्हा जयगड पोलीस स्थानकाकडून योग्य पद्धतीने तपास झाला नाही असा आक्षेप घेण्यात आला. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बी.बी महामुनी यांना याबाबतची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यांनी केलेल्या चौकशीनंतर जयगडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांची रत्नागिरी जिल्हा नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. या चौकशीत निष्काळजीपणा दाखवल्याबाबत आणखीन दोन कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे त्याचा अहवाल ही अंतिम टप्प्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांची बदली झाल्यानंतर आता त्यांच्या जागेवर पूर्णगडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



