सरचिटणीस डॉ. चंद्रजित जाधव यांची घोषणा
ठाकरे शिवसेनेचे जिल्हा युवा अधिकारी प्रसादसावंत यांच्याकडून शुभेच्छा
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनने २०२६-२७ हंगामासाठी निवड समिती व राष्ट्रीय संघ प्रशिक्षकांची घोषणा नुकतीच सरचिटणीस डॉ. चंद्रजित जाधव यांनी पुणे येथे पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत केली. यामध्ये रत्नागिरीचे राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांची किशोर-किशोरी गटातील निवड समितीवर झाली आहे.
पुणे येथे झालेल्या बैठकीवेळी कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. पुरुष व महिला गटातील निवड समितीत अनुभवी सदस्यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत सोमनाथ स्वामी (सांगली), तुषार मोरे (मुंबई उपनगर), रविराज परामने (ठाणे) आणि रत्नराणी कोळी (लातूर) यांचा समावेश आहे. कुमार व मुली गटासाठी श्रीरंग बनसोडे (सोलापूर), विशाल पाटील (जळगाव), यतीश आक्रे (पालघर) आणि नंदिनी धुमाळ (मुंबई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच किशोर– किशोरी गटासाठी अमोल चव्हाण (जालना), पंकज चवंडे (रत्नागिरी), रमेश लव्हाट (अहिल्यानगर) आणि तृप्ती गाडगीळ अग्रवाल (पुणे) यांची निवड समितीत नियुक्ती केली आहे.
रत्नागिरीतील तळागाळातील मुलींना खो-खोचे प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय स्तरावर नेण्यात पंकज चव्हाण यांची मोलाची भूमिका आहे. गेल्या अनेक वर्षे श्री चवंडे यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावली आहे. महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांचे किशोर किशोरी गटाच्या निवड समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल खो-खो प्रेमींमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
पंकज चव्हाण यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी सचिव संदीप तावडे, रत्नागिरी जिल्हा खो खो असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, ठाकरे शिवसेनेच्या युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी प्रसाद सावंत, शिर्के प्रशालेचे क्रीडाशिक्षक विनोद मयेकर, प्रशांत कवळे, सचिन लिंगायत, राजेश चव्हाण यांच्यासह खोखो प्रेमींनी अभिनंदन केले आहे.



