लांजा: माचाळ येथे पर्यटनासाठी येणाऱ्या मद्यधुंद पर्यटकांंची हुल्लडबाजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि कौटुंबिक पर्यटक यांना होणारा मनस्ताप थांबताना दिसत नाही. अशातच ग्रामस्थांनी केलेल्या सततच्या तक्रारीमुळे लांजा पोलीसांनी माचाळकडे जाणाऱ्या मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची कसून तपासणी करूत १९ पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करपाण्यात आली.
मद्यधुंद पर्यटन हुल्लडबाजी करत निसर्ग सौंदर्याला गालबोट लावत असल्याने काही दिवसांपूर्वी पोलिसांच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. तसेच ग्रामपंचायतीच्यावतीने जागोजागी सूचना फलक लावण्यात आले आहेत. तरी देखील मद्यधुंद पर्यटकांचा धुडगूस थांबत नाही. या रोजच्या मनस्तापामुळे ग्रामस्थांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
अशा वारंवार निसर्ग सौंदर्याला बाधा आणणाऱ्या पर्यटकांच्या येणाऱ्या तक्रारींमुळे रविवारी लांजा पोलीसांच्या पथकाने माचाळ येथे जाणाऱ्या पर्यटकांची माचाळला जाण्यापूर्वी गस्त घालत कसून तपासणी केली. दुचाकीस्वारांसह सर्वच वाहनांची तपासणी करत मद्य नेण्यापासून रोखण्यात आले. त्याचप्रमाणे बेशिस्त पर्यकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
रविवारी माचाळ येथे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. तसेच दंडात्मक कारवाई केल्यानंतर येथून पुढे माचाळ परिसरात मद्यधुंद पर्यटकांवर कठोर कारवाई केली जाईल अशा सक्त सूचना पोलीसांच्यावतीने देण्यात आल्या आहेत.