Wednesday, April 8, 2026

Latest Posts

लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित; प्रदूषणाचे दावे कंपनीने फेटाळले

रत्नागिरी | प्रतिनिधी : प्रतिनिधी लोटे परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील ‘लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड’चा (LOIL) उत्पादन प्रकल्प पर्यावरणाचे सर्व नियम आणि सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करत आहे. इटलीतील ज्या कंपनीबाबत चर्चा होत आहे, तिचा आणि लक्ष्मी ऑरगॅनिकचा कोणताही थेट संबंध नसून, कर्जबाजारी झालेली ती कंपनी आम्ही विकत घेतली आहे. या प्रकल्पातून पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही, असा ठाम दावा कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (उत्पादन विभाग) दीपक पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

रत्नागिरीतील हॉटेल विवेक येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष (पर्यावरण, आरोग्य आणि सुरक्षा) उदय वैशंपायन, अध्यक्ष (उत्पादन विभाग) राजेश नाईक आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

इटलीतील कंपनीचा वाद काय?

इटलीतील ज्या कंपनीवर बंदी घातली गेली, त्याबाबत स्पष्टीकरण देताना दीपक पाटील म्हणाले की, ती कंपनी पीएफएएस (PFAS) रसायनावर प्रक्रिया न करता ते थेट पाण्यात सोडत होती. मात्र, लक्ष्मी ऑरगॅनिकने ती कंपनी विकत घेतल्यानंतर आता सर्व प्रक्रिया प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या देखरेखीखाली केली जात आहे. हे सांडपाणी तळोजा येथे नेऊन शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट केले जाते. त्यामुळे इटलीतील प्रकरणाचा या प्रकल्पाशी संबंध जोडून संभ्रम निर्माण करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

लोटे येथील प्रकल्पाबाबत कंपनीने खालील महत्त्वाची माहिती दिली:

क्लोज्ड-लूप प्रणाली: पर्यावरणात घातक पदार्थ पसरू नयेत यासाठी प्रगत ‘क्लोज्ड-लूप’ प्रणालीचा वापर.

सांडपाणी व्यवस्थापन: सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक ‘ETP’ आणि गळती रोखणारी यंत्रणा कार्यान्वित आहे.

वैज्ञानिक विल्हेवाट: घातक टाकाऊ पदार्थ उच्च-तापमान भस्मीकरण (Incineration) पद्धतीद्वारे नष्ट करण्यासाठी सरकारी मान्यताप्राप्त सुविधेकडे पाठवले जातात.

डिजिटल ट्रॅकिंग: टाकाऊ पदार्थांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता राखण्यासाठी डिजिटल ट्रॅकिंगचा वापर.

कंपनीने स्पष्ट केले की, गेल्या ३५ वर्षांपासून महाडमध्ये कंपनीने विश्वासाने काम केले आहे. लोटे येथील प्रकल्पाबाबत काही लोकांनी उपोषण केले किंवा शिष्टमंडळे आली, त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. हा प्रकल्प सेमीकंडक्टर, संरक्षण क्षेत्र, ईव्ही (EV) आणि औषधनिर्माण क्षेत्रासाठी लागणारी महत्त्वाची रसायने तयार करणारा असून, देशाच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे.

“आम्ही नियामक संस्था आणि सर्व भागधारकांशी पारदर्शक संवाद ठेवण्यास कटिबद्ध आहोत. जागतिक स्तरावरील पर्यावरणाचे निकष पाळणे हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे यावेळी लक्ष्मी ऑरगॅनिकचे वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक पाटील यांनी सांगितले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.