संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावर वांद्री येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा फटका येथील ग्रामस्थांना बसला आहे. कामादरम्यान मंदिराच्या बाजूला असलेली संरक्षक भिंत कोसळून दगड आणि चिखल थेट सोमेश्वर मंदिरात शिरला आहे, त्यामुळे भाविकांना मंदिरात जाणेही कठीण झाले आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वांद्री येथे सध्या उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. ठेकेदाराने उड्डाणपुलाचे काम करताना मंदिराच्या बाजूने तात्पुरता रस्ता (डायव्हर्जन) तयार केला होता. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर चिखल साचला होता. विशेष म्हणजे, डायव्हर्जन बनवताना ठेकेदाराने सोमेश्वर मंदिराला लागून असलेल्या नाल्यातून वाहणाऱ्या पाण्यासाठी योग्य व्यवस्था ठेवली नाही. यामुळे नाल्याला अडथळा निर्माण होऊन पाणी साचून राहिले.
गुरुवार आणि शुक्रवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्याचा दाब वाढला आणि मंदिरालगतची दगडांनी बांधलेली भिंत कोसळली. भिंतीसोबतच दगडमिश्रित चिखलाचा मोठा ढिगारा थेट सोमेश्वर मंदिराच्या दारात साचला. यामुळे मंदिरात प्रवेश करणे अशक्य झाले आहे. शनिवारी सकाळी नियमित पूजा करण्यासाठी गुरव मंदिरात आले असता, त्यांना भिंत कोसळल्याचे आणि मंदिरात चिखल शिरल्याचे दिसले.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ठेकेदाराच्या बेजबाबदारपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन हा चिखल आणि माती उचलण्याचे काम हाती घेतले आहे. ग्रामस्थांनी यापूर्वी ठेकेदाराला या समस्येची कल्पना दिली होती, मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही परिस्थिती ओढवल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पहिल्याच पावसात अशी घटना घडत असेल, तर आगामी मुसळधार पावसाळ्यात किती मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.