रत्नागिरी: जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी दिनांक २३ जुलै २०२५ रोजी जयगड पोलीस ठाणे हद्दीतील वाटद खंडाळा M.I.D.C. परिसराचा दौरा करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. या दौऱ्याच्या अनुषंगाने जयगड पोलीस ठाण्यात समन्वय बैठक घेण्यात आली.
या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी श्री. निलेश माईनकर, पोलीस निरीक्षक जि.वि.शा. श्री. अश्वनाथ खेडकर, तसेच जयगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. कुलदीप पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत वाटद खंडाळा M.I.D.C परिसरात होणारी औद्योगिक वाढ, वाढती रहदारी, कामगारांचे स्थलांतर, आणि परिसरातील सुरक्षा विषयक उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक बगाटे यांनी या भागातील पोलीस बंदोबस्त अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.
त्यानंतर त्यांनी वाटद गाव व MIDC परिसराला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर लवकरच उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले.