रत्नागिरी : शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी प्रसिद्ध विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध रत्नागिरीतील शिवसेना कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ रत्नागिरी शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन केले व कुणाल कामरा याच्याविरोधात रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख बिपिनजी बंदरकर, तालुका प्रमुख महेश ऊर्फ बाबू शेठ म्हाप, माजी ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, नेताजी पाटील, सौरभ मलुष्टे, परिमल घोसाळे, संध्या कोसुंबकर, प्रथमेश साळवी आणि गीता शिंदे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. या सर्वांनी कुणाल कामरा याच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला व त्याच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली.
शिवसेना कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे आक्षेपार्ह तसेच शिवसेनेच्या भावना दुखावणारे आहे. या वक्तव्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तक्रार दाखल करताना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे.
