रत्नागिरी: मंगळवारी दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील लांजा-विलवडे – आडवली स्थानकांदरम्यान मंगळवारी सायंकाळी ६.२० वाजण्याच्या सुमारास मातीमिश्रित दरड कोसळल्याची घटना घडली आहे. मान्सूनपूर्व पावसातच ही घटना घडल्याने कोकण रेल्वेच्या आपत्कालीन तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे चारहून अधिक एक्सप्रेस गाड्यांच्या सेवांवर परिणाम झाला असून, वाहतूक विस्कळीत झाली आहे.
जिल्ह्यात दुपारपासून पावसाची संततधार सुरू होती. या पहिल्याच मोठ्या पावसाचा फटका कोकण रेल्वे प्रशासनाला बसला आहे. विलवडे-आडवली दरम्यान रेल्वे रुळावर माती मिश्रित दरड कोसळल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ही बाब वरिष्ठांना कळवल्यानंतर कोकण रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुळावरील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
या घटनेमुळे जनशताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस कणकवली स्थानकात थांबवण्यात आल्या, तर नेत्रावती एक्सप्रेसला संबंधित स्थानकात थांबा देण्यात आला. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या अन्य अनेक गाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाला असून, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात अधिक तपशील अद्याप उपलब्ध होऊ शकलेला नाही. दरड हटवून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.