रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मूलभूत नागरी समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असून, या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर यांनी आज भाजप पदाधिकारी व माजी नगरसेवकांसह रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांची भेट घेऊन जाब विचारला. शहरातील समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
सध्या रत्नागिरी शहरातील रस्त्यांची दुरवस्था, अनियमित पाणीपुरवठा, गटार लाईनची खराब स्थिती, आरोग्य व्यवस्था, तसेच शहरात वाढलेली भटक्या कुत्र्यांची समस्या या सर्व बाबींचा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राऊंडवर अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या ठिकाणी नियमित साफसफाई, कचरा व्यवस्थापन व निर्जंतुकीकरणाची तातडीने व्यवस्था व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी मुख्याधिकाऱ्यांकडे खालील प्रमुख मागण्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली:
१. शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची डागडुजी व डांबरीकरण तातडीने करावे.
२. पाणीपुरवठा नियमित व वेळापत्रकानुसार सुरळीत करावा.
३. गटार लाईनची स्वच्छता व देखभाल नियमित करावी.
४. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.
५. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षमपणे राबवावी.
सध्या रत्नागिरी शहरातील परिस्थिती पाहता, रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रशासकीय कामाबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे निदर्शनास येते आहे. शहरातील नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे काम होत नसल्याचे दिसून येत असून, याचा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर वाईट परिणाम होणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांची भाजप जिल्हाध्यक्ष राजेश मयेकर, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, माया मयेकर सावंत, शहराध्यक्ष दादा ढेकणे, सर्व माजी नगरसेवक राजेश तोडणकर, समीर तिवरेकर, मुन्ना चवंडे, रायकर मॅडम, करमरकर मॅडम, रसाळ मॅडम, माजी शहर अध्यक्ष राजन फाळके, मंदार मयेकर, मंदार खंडकर, निलेश आखाडे, शैलू बेर्डे, अण्णा करमरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी बोलताना अशोक मयेकर यांनी सांगितले की, “शहरवासीय मोकाट गुरे व कुत्रे, अस्वच्छ गटार आणि रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे त्रस्त आहेत. या बाबतीतला जाब विचारण्यासाठी आम्ही प्रशासनाकडे गेलो होतो. त्यांना यावर उपाययोजना करायला सांगितल्या आहेत आणि त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करताना नगरपालिकेचा स्टाफ दिसला पाहिजे. कारण प्रशासनाबद्दल रत्नागिरीकरांमध्ये प्रचंड असंतोष आहे.”