रत्नागिरी: आज बाल विवाह प्रतिबंधक अभियान अंतर्गत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून साळवी स्टॉप येथील नाथपंथी वस्ती, रत्नागिरी येथे महिला व बाल विकास कार्यालय व प्रेरणा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला पाच SSCWs, वस्तीतील प्रमुख व झोपडपट्टीचे अध्यक्ष सुनील जगताप, पल्लवी परब, युवा वर्ग, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक रहिवासी तसेच किशोरवयीन मुलांसह लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रत्नागिरी SSCWs यांनी वस्तीमध्ये फिरून नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमासाठी सहभागाबाबत जनजागृती (mobilization) केली. त्यानंतर औपचारिक स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मुलांनी “माणसाने माणसाशी माणसासम वागणे” या प्रार्थनेने केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन SSCW विजेता यांनी केले. SSCW अमर यांनी “असावा सुंदर समतेचा बंगला” हे उत्साहवर्धक गीत घेऊन मुलांमध्ये ऊर्जा निर्माण केली. संवाद सत्रापूर्वी मुलांना बाल विवाह प्रतिबंधावर आधारित ‘कोमल’ या मुलीच्या कथेवर आधारित शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली.
यानंतर SSCW रसिका आयरे यांनी बाल हक्कांवर मुलांशी संवाद साधला, तर प्रेरणा संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा समन्वयक अश्विनी कांबळे यांनी मुलांना व पालकांना चाइल्ड लाईन आणि बाल विवाह कायद्याबाबत सोप्या भाषेत माहिती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना व उपस्थितांना जिलेबी वाटून कार्यक्रमाचा समारोप गोड करण्यात आला.



