मुंबई: गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि माघी गणेश जयंती वेळी प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून बनवलेल्या सहा फुटापर्यंतच्या सर्व मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करणे बंधनकारक आहे. या निर्देशांची माहिती सर्व पालिकांना द्यावी असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. गेल्या वर्षी पाच फूट उंचीच्या खूप कमी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले, याकडे मुख्य न्या. आलोक आराध्य व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने लक्ष वेधले. यावर्षी पाच फुटापर्यंतचा पीओपी मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करण्यात येईल याची काटेकोर अंमलबजावणी होईल अशी माहिती महाअधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी उच्च न्यायालय दिली. मात्र, २१ जुलै रोजी राज्य सरकारने आखलेल्या धोरणानुसार, ५ फूट पीओपी मूर्तींच्या धोरणावर उच्च न्यायालयाने असमाधान व्यक्त करीत पाच ऐवजी ६ फुटापर्यंतच्या मूर्तींच्या कृत्रिम तलावात विसर्जनाचे आदेश दिले.
न्यायालयाचे निर्देश असे
१) २१ जुलैच्या धोरणाचे काटेकोरपणे पालन करावे.
२) सर्व स्वराज्य संस्थांना नवीन नियमावर निर्देश द्यावेत.
३) स्थानिक यंत्रणांनी सार्वजनिक मंडळांना लहान उंचीच्या मूर्ती बसविण्यास प्रोत्साहन द्यावे.
४) उंच मूर्तींच्या पुनर्वापरातून पुढील वर्षी लहान उंचीचा गणेश मूर्ती तयार करण्याबाबत त्यांच्या जागरूकता वाढवावी.
५) पीओपी चा पुनर्वापर व पाण्यात त्याचे जलन विघटन, याचा अभ्यास करण्यास तज्ञांची समिती स्थापन करावी.