रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे एसटी कर्मचाऱ्यांसाठी आंतरविभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत रत्नागिरी विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभागी होत यश मिळवले आहे. सर्व यशस्वी कर्मचाऱ्यांची रत्नागिरी विभागातर्फे शहरातील मारुती मंदिर येथून विभागीय कार्यालयापर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली.
महामंडळातर्फे आयोजित आंतरविभागीय नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सोलापूर येथे पार पडली. या स्पर्धेत रत्नागिरी विभागाने सादर केलेल्या ‘नाती-गोती’ नाटकाने उपविजेतेपद पटकावले आहे. स्पर्धेत नेपथ्यासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
तसेच आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धा संभाजीनगर येथे पार पडली. अंतिम सामन्यात रत्नागिरी विभागीय कर्मचारी संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. महामंडळाच्या आंतरविभागीय कबड्डी स्पर्धा व वार्षिक क्रीडा स्पर्धा जळगाव येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रत्नागिरी विभागीय कर्मचारी संघाने विजेतेपद मिळवले आहे. वार्षिक क्रीडा स्पर्धेंतर्गत वैयक्तिक थाळीफेक प्रकारात पूजा झापडेकर यांनी कांस्यपदक मिळवले आहे.
रत्नागिरी विभागीय कर्मचाऱ्यांनी मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विजयी मिरवणूक काढली. यावेळी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, विभागीय वाहतूक अधीक्षक प्रमोद यादव, विभागीय कर्मचारी, अधिकारी राजेश्वर जाधव, विभागीय सांख्यिकी अधिकारी राकेश पवार, विभागीय लेखाधिकारी तथा कामगार अधिकारी विलास चाैगुले, सुरक्षा व दक्षता अधिकारी मकरंद ओटवणेकर, विभागीय अभियंता बालाजी कांबळे यांनी अभिनंदन केले आहे.


