रत्नागिरी: बँका , खाजगी वित्तसंस्था, तसेच ऑनलाईन वित्तपुरवठा करणाऱ्या ॲपसाठी काम करणाऱ्या वसुली एजंटाच्या मनमानी व अवैध वसुली कारभाराविरोधात कडाक कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री धनंजय कुलकर्णी यांची भेट घेवून आज मनसे तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव यांच्या नेतृत्वात मनसेकडून निवेदन देण्यात आले. रत्नागिरी जिल्हाभरातून अनेक बँका, खाजगी वित्तसंस्था तसेच ऑनलाईन ॲप च्या माध्यमातून नागरिकांना लोन दिली जातात, अनेक नागरीकांच्या मनसेकडे लिखित तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये या बँका तसेच खाजगी संस्थांच्या recovery agents कडून रिजर्व बैंक ऑफ इंडिया च्या मार्गदर्शक प्रणालीचे खुलेआम उल्लंघन होत असून सर्वसामान्य नागरिकांना फोन अथवा प्रत्यक्ष अश्लील शिवीगाळ, घरी जावून मानसिक त्रास देणे, तसेच ग्राहकाच्या नातेवाईक तसेच मित्र परिवारातील लोकांना मानसिक त्रास देणे , तसेच त्यांचा काहीही सबंध नसताना देखील त्यांच्या निवास स्थानी जावून मानसिक त्रास देणे , आरबी आय घालून दिलेल्या वेळेचे देखील बंधन पाळले जात नाही या गंभीर विषयाची आपण दखल घेवुन सर्वसामान्य जनतेला लवकरात लवकर दिलासा द्यावा अन्यथा मनसे पक्षाच्या वतीने आम्हाला यात हस्तक्षेप करावा लागेल असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मनसेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना विनंती करण्यात आली आहे की सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशन मध्ये यासंबधी एका स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात यावी जेणेकरून या वसुली एजंटांच्या मनमानी आणि जुलुमी कारभाराविरोधात सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल. या सर्व प्रकरणाची गंभीर दखल पोलिस प्रशासनाने घेतली असून त्यासंबंधी लवकरच कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन मनसेला पोलिस अधीक्षकांकडून देण्यात आले आहे. सदरहू निवेदन देताना मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव, तालुका सचिव ॲड अभिलाष पिलणकर, तालुका उपाध्यक्ष श्री राजू पाचकुडे, विभाग अध्यक्ष श्री सोम पिलणकर, विभाग सचिव श्री रोहन शेलार आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.