रत्नागिरी : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या गायन, वादन आणि नृत्य अलंकार परीक्षेत रत्नागिरीतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये तबला विषयात केदार लिंगायत हे अलंकार प्रथम परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांना गुरु पंडित आमोद दंडगे यांचे मार्गदर्शन लाभले.
वडील (कै.) कृष्णा लिंगायत उत्तम साथसंगत करत असल्याने लहानपणापासूनच केदार यांना वादनाचे बाळकडू मिळाले आहे; मात्र २००४ पासून केदार यांनी तबल्याचे शास्त्रोक्त शिक्षण घ्यायला सुरुवात केली. सुरवातीला (कै.) विनायकबुवा रानडे, हेरंब जोगळेकर, प्रसाद करंबेळकर आणि सध्या पं. आमोद दंडगे यांच्याकडे तबल्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेत आहेत. २०१३ पासून ते रियाज तबला अकॅडमी आणि स्वरनिनाद संगीत विद्यालयाच्या माध्यमातून वादनाची आवड असलेल्यांना मार्गदर्शन करत आहेत. सध्याच्या घडीला सुमारे १५० विद्यार्थी केदार लिंगायत यांच्याकडे तबल्याचे शिक्षण घेत आहेत. त्यांचे आतापर्यंत ८ विद्यार्थी तबला विशारद झाले आहेत.
त्याचप्रमाणे गायन विषयातून सायली मुळ्ये-दामले यादेखील अलंकार प्रथम परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. त्यांना गुरु संध्या सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले.
कथक विषयातून सौ. दर्शना लोध-कामेरकर यांच्या विद्यार्थिनी आसावरी आखाडे (प्रथम श्रेणी), मृणाली डांगे (द्वितीय श्रेणी), अनुजा गांधी (प्रथम श्रेणी) तसेच गुरु सौ. शिल्पा मुंगळे यांच्या विद्यार्थिनी आकांक्षा साळवी (द्वितीय श्रेणी), सोनम जाधव (द्वितीय श्रेणी) अलंकार प्रथम परीक्षा उत्तीर्ण झाल्या.
तर देवगड (जि. सिंधुदुर्ग) येथील मृणाल केळकर या अलंकार पूर्ण परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. मृणाल यांनाही सौ. दर्शना लोध-कामेरकर यांचे मार्गदर्शन लाभले. उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.