रत्नागिरी :- रत्नागिरीतील “कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा” व आयोजक कांचन मालगुंडकर यांच्या कार्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भरभरून कौतुक केले. या स्पर्धेचा दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळा काल जयेश मंगल कार्यालयात पार पडला, त्यावेळी सामंत म्हणाले की, स्वतःच्या ताकदीवर अशी भव्य स्पर्धा घेणे हे जिकरीचे काम आहे. रत्नागिरीतील युवापिढी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणाचा संस्कार जपण्याचा प्रयत्न करते. या संस्कारांना, त्यांच्यातील कलेला जपण्यासाठी सजावट स्पर्धा व बालमूर्तीकारांसाठी गणेशमूर्ती घडविण्याची स्पर्धा घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे निःस्वार्थ कार्य कांचन करत आहे. यासाठी त्याचे कौतुक करावे तितके कमी आहे. या स्पर्धा घेऊन त्यातून मिळालेल्या लोकप्रियतेद्वारे नगर परिषद, जिल्हा परिषदसाठी तिकीट मागून त्याचा राजकीय फायदा उठविण्याचाही विचार त्याने मला कधीही बोलून दाखविलेला नाही. हेच कांचन याचे निःस्वार्थ कार्य असल्याचे द्योतक आहे. भविष्यात त्याने अशाचप्रकारे विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम घ्यावेत, त्यासाठी मी त्याच्या पाठीमागे सदैव उभा असल्याचा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलून दाखवला.
या सोहळ्यावेळी भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे व कांचन मालगुंडकर यांच्या हस्ते मंत्री उदय सामंत यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला दिग्गज अभिनेता वैभव मांगले, अभिनेता पॅडी तथा पंढरीनाथ कांबळे, अभिनेत्री वीणा जामकर या सेलिब्रेटीनी विशेष हजेरी लावली. पॅडी कांबळे यांनीही कांचन यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. यावेळी सर्व विजेते, परीक्षक व मान्यवरांना मंत्री सामंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
“कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा 2025″मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त आशिष वाडकर (15 हजार व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र – श्री देव भैरी मंदिर देखावा, लक्ष्मीकांतवाडी, मिरजोळे), द्वितीय क्रमांक प्राप्त राहुल पाडावे व एकता परिवार (10 हजार व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र – संत एकनाथ महाराज देखावा, मिरजोळे ), तृतीय क्रमांक प्राप्त संतोष कुड (6 हजार व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र – रेड्यामुखी वेद, संत ज्ञानेश्वर देखावा, पड्यारवाडी, गावखडी), तसेच सुबक गणेशमूर्ती – साईराज वाडकर (लक्ष्मीकांतवाडी, मिरजोळे ), वामन सुवारे (फगरवठार, साळवी बंधू देखावा ), याचबरोबर विशेष उल्लेखनीय, उत्तेजनार्थ व प्रोत्साहनपर पारितोषिक प्राप्त विजेत्यांना मंत्री उदय सामंत व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यात महिला मंडळाने उत्कृष्ट मंगळागौर सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी रंगमंचावर मुन्ना सुर्वे, प्रसन्न आंबुलकर, प्रवीण जैन, मुकेश गुंदेजा, राजू घाग, रक्षा घाग, वैभवी खेडेकर, सुदेश मयेकर, गौरंग आगाशे, बाबू माप, विजय खेडेकर, गणेश धुरी व इतर मान्यवर आणि सर्व स्पर्धक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते
*प्रथम क्रमांक प्राप्त विजेत्यांसाठी नवा नियम*
प्रतिवर्षी ही स्पर्धा होते आणि त्यामध्ये अनेकवेळा त्याच त्याच विजेत्यांना प्रथम क्रमांक प्राप्त होतो. अर्थात त्यांच्या उत्कृष्ट कामामुळेच हा सन्मान त्यांना मिळतो. पण काहीवेळा थोड्या फरकाने यामुळे इतरांवर अन्याय होत असतो. त्यामुळे पुढीलवर्षीपासून प्रथम क्रमांक प्राप्त विजेत्यांसाठी नवा नियम कांचन यांनी यावेळी बोलून दाखविला. प्रथम क्रमांक प्राप्त विजेत्याला त्यापुढील दोन वर्षे स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे इतरांनाही प्रथम क्रमांक प्राप्त करण्याची संधी मिळेल.




