रत्नागिरी – क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, व्दारा जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांचा उद्या १५ ऑगस्ट रोजी मुख्य शासकीय कार्यक्रमामध्ये पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे.
उत्कृष्ट खेळाडू (१ महिला, १ पुरुष, १ दिव्यांग खेळाडू) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक १ यांच्या कार्याचे, योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख दहा हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.सन २०२१-२२ ते २०२४-२५ या कालावधीतील जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शकासाठी मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारात नॅशनल गेम्स, वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेले खेळाडू तसेच राज्य/जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकापर्यंत यश मिळविणारे खेळाडू घडविणारा मार्गदर्शक यांना हा पुरस्कार देण्यात येतो. गुणवंत खेळाडू (महिला, पुरुष, दिव्यांग) यासाठी मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य/राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ कनिष्ठ शालेय व केंद्र शासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धा मधील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूस गुणवंत खेळाडू पुरस्कार वितरीत करण्यात येतो. अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूस जिल्हा क्रीडा पुरस्कार थेट देण्यात येतो.
धनुर्विद्या क्रीडा प्रकारासाठी मार्तंड संजय झोरे, ईशा केतन पवार व खोखो खेळासाठी श्रेया राकेश सनगरे, पायल सुधीर पवार, कॅरम खेळासाठी आकांक्षा उदय कदम, योगासनासाठी प्राप्ती शिवराम किनरे यांना गुणवंत खेळाडू पुरस्कार देण्यात येणार आहे. मल्लखांब क्रीडाप्रकारासाठी रणवीर अशोक सावंत, जलतरणसाठी महेश शंकर मिलके यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात येणार आहे.






