रत्नागिरी :रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी विराजमान होताच सौ. शिल्पा सुर्वे यांनी थेट जनसामान्यांच्या, आणि विशेषतः गृहिणींच्या जिव्हाळ्याच्या विषयाला हात घालत कामाचा धडाका लावला आहे. “पाणी हेच जीवन आहे आणि सकाळचे पाणी वेळेत आले नाही तर गृहिणींचे पूर्ण नियोजन कोलमडते,” अशी भावना व्यक्त करत आज (शनिवारी) त्यांनी साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्र आणि पानवल धरणाला भेट देऊन पाणी पुरवठ्याचा सविस्तर आढावा घेतला.
साळवी स्टॉप: कचरा डेपो आणि प्लास्टिक रिसायकलिंगचा अभिनव प्रयोग
नगराध्यक्षांनी सर्वप्रथम साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांच्या लक्षात आले की, पाण्याच्या टाकीच्या शेजारीच कचरा डेपो आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “पाण्याच्या टाकीजवळ पडणारा कचरा आरोग्यासाठी घातक आहे. ही कचरा डेपोची जागा आम्ही बदलणार आहोतच, पण तोपर्यंत प्राथमिक उपाय म्हणून हा कचरा ‘बंदिस्त’ करण्यात येईल. तसेच, प्लास्टिक कचऱ्याचे रिसायकलिंग करून त्यापासून प्लास्टिकच्या खुर्च्या तयार करण्याचा मानस असून, त्या खुर्च्या नगरपालिकेतच वापरल्या जातील, अशी अभिनव संकल्पना आम्ही राबवणार आहोत.”
पानवल धरण: ग्रॅव्हिटीने पाणी अन् पैशांची बचत
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पानवल आणि शीळ धरणांची पाहणी नगराध्यक्षांनी केली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून पानवल धरणाचे काम प्रगतीपथावर आहे. ‘निर्माण ग्रुप’तर्फे हे काम सुरू असून जानेवारी महिन्यात ते पूर्ण होईल. विशेष म्हणजे, या धरणातून शहराला येणारे पाणी हे पूर्णपणे नैसर्गिक प्रवाहाने म्हणजेच ‘ग्रॅव्हिटी’ने (Gravity) येणार आहे. यामुळे पंपिंगसाठी लागणारी वीज वाचणार असून नगरपरिषदेच्या लाईट बिलात मोठी बचत होणार आहे.”
जोशी नाल्याचे पाणी वळवणार
शहराला उन्हाळ्यातही मुबलक पाणी मिळावे, यासाठी पानवल जवळ असलेला ‘जोशी नाला’ पानवल धरणाला जोडण्याची योजना असल्याचे शिल्पा सुर्वे यांनी सांगितले. याबाबत लवकरच पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून निधी उपलब्ध केला जाईल, असेही त्या म्हणाल्या.
मान्यवरांची उपस्थिती
या पाहणी दौऱ्यात नगराध्यक्षांसोबत स्थानिक नगरसेवक सौरभ मलुष्टे, नगरसेविका पूजा पवार, पप्पुशेठ सुर्वे, दीपक पवार आणि नगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
एका गृहिणीची जाण असलेल्या नगराध्यक्षांनी पहिल्याच दिवशी पाणी प्रश्नावर लक्ष केंद्रित केल्याने रत्नागिरीकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.



