रत्नागिरी : राजकारणापेक्षा जनतेचे समाजकारण आम्ही या शाखेत बसून करणार असल्याची स्पष्टोक्ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी दिली.
ठाकरे सेनेचे नवनियुक्त तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी साळवी स्टॉप येथील शिवसेना शाखेत हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही दोस्ती राजकारणापलीकडची असल्याचे सांगितले.
बंड्या साळवी हे ठाकरे गटाचे रत्नागिरीचे तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत होते. २४ जानेवारी रोजी ठाकरे गटातून शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या जागेवर शेखर घोसाळे यांची रत्नागिरीच्या तालुकाप्रमुख पदी वर्णी लागली. त्यानंतर शिवसैनिक आणि तालुकाप्रमुख म्हणून इतकी वर्ष कारभार हाकलेली साळवी स्टॉप येथील शिवसेनेची शाखा कोणाची असा नवा वाद निर्माण झाला होता. मात्र याबाबतीत बंड्या साळवी यांनी पक्ष वेगळा झाला असला तरी आपली मनदुभंगलेली नसल्याचे सांगतानाच शेखर घोसाळे यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज सायंकाळी बंड्या साळवी यांनी शिवसेनेच्या साळवी स्टॉप येथील शाखेत हजेरी लावत शेखर घोसाळे यांना शुभेच्छा दिल्या.
आणि दोन्ही तालुकाप्रमुख याच शाखेत बसून आपापला कारभार हाकणार असून राजकारणापेक्षा जनतेचे समाजकारण करणार असल्याचे सांगितले.

