Monday, March 23, 2026

Latest Posts

भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त रत्नागिरीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरी : भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक पर्वावर, रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अमृतमहोत्सवी सोहळ्याची माहिती रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी दिली. हा सोहळा शनिवारी (३ जानेवारी) सायंकाळी ५.४५ वाजता रत्नागिरीतील हॉटेल विवेक येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

येथील शासकीय विश्रामगृहात आज (१ जानेवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. प्रसन्न वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक आणि महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता ॲड. मकरंद साठे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. संविधानाच्या मूल्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि या गौरवशाली प्रवासाचे स्मरण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.


पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. विलास पाटणे यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. जगातील अनेक देशांच्या राज्यघटना अल्पकाळ टिकल्या असताना, भारतीय राज्यघटना ७५ वर्षे दिमाखात टिकून आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून या घटनेच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सर्वांचे त्यांनी स्मरण केले. विशेषतः मसुदा समितीतील १५ महिला सदस्यांच्या योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला. संविधानाने माणसाला मूलभूत अधिकार दिले असून, ते अधिकार समजून घेणे ही काळाची गरज आहे.

केशवानंद भारती खटल्याचा संदर्भ देत त्यांनी स्पष्ट केले की, संविधानाची मूलभूत चौकट बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हे संविधान सामान्य जनतेपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणे हे न्यायव्यवस्था, पत्रकार आणि राजकीय क्षेत्रातील सर्वच स्तरावरील घटकांचे कर्तव्य आहे. देशातील वातावरण स्वच्छ आणि विकासशील ठेवण्यासाठी संविधानाचा प्रसार होणे आवश्यक आहे.

या ऐतिहासिक सोहळ्याला रत्नागिरीतील नागरिकांनी आणि विधी क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सचिव ॲड. रत्नदीप चाचले व बार असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेला ॲड. निनाद शिंदे, ॲड. शाल्मली आंबुलकर, ॲड. अवधूत कळंबटे, ॲड. राहुल चाचे उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.