लांजा (रत्नागिरी): लांजा तालुक्यातील मठ येथील सुप्रसिद्ध आणि जागृत देवस्थान असलेल्या श्री देव लक्ष्मी पल्लिनाथ संस्थानचा ११० वा चैत्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. सलग पाच दिवस चाललेल्या या पारंपरिक उत्सवाची सांगता झाली असून, हजारो भाविकांनी देवाच्या दर्शनासाठी आणि भोवत्यांच्या सोहळ्यासाठी गर्दी केली होती.
पाच दिवसांच्या या उत्सवा निमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दररोज सायंकाळी देवाची विलोभनीय आरती आणि सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्य आकर्षण: उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या ‘भोवत्या’ पाहण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी भाविकांचा मोठा उत्साह दिसून आला.
श्री देव लक्ष्मी पल्लिनाथ देवावर असलेल्या श्रद्धेपोटी केवळ लांजाच नव्हे, तर संपूर्ण कोकणातून भाविक या ठिकाणी दाखल झाले होते. रत्नागिरी, राजापूर, गुहागर, दापोली यांसह शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, आडिवरे अशा विविध भागांतून भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली.
गेल्या ११० वर्षांपासून सुरू असलेली ही उत्सवी परंपरा आजही तितक्याच उत्साहात जपली जात आहे. उत्सवाच्या पाचही दिवसात मठ परिसर भाविकांच्या गर्दीने आणि ‘लक्ष्मी पल्लिनाथाच्या’ जयघोषाने दुमदुमून गेला होता. स्थानिक ग्रामस्थ आणि देवस्थान कमिटीने सर्व भाविकांसाठी चोख नियोजन केले होते, ज्यामुळे हा ११० वा सांगता सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.



