रत्नागिरी: शहरात सध्या मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याने थैमान घातले आहे. याच वादळी पावसाचा मोठा फटका नव्यानेच कोट्यवधी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आलेल्या रत्नागिरी रेल्वे स्थानकाला बसला आहे.
५ जुलै रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे रेल्वे स्थानकाचे छत अचानक कोसळले. केवळ काही सेकंदांत घडलेल्या या थरारक घटनेमुळे स्थानकात एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटनेमुळे रेल्वे स्थानकाचा (विशेषतः रिक्षा स्टँडकडील) काही भाग पूर्णपणे अंधारात बुडाला होता.
पाऊस सुरू झाल्यामुळे अनेक प्रवासी आणि नागरिक आसऱ्यासाठी याच छताखाली उभे होते. मात्र, ऐनवेळी नागरिकांच्या हे लक्षात आले की छत कोसळत आहे. अत्यंत सावधगिरी बाळगत सर्वांनी तातडीने तिथून बाजूला पळ काढल्यामुळे सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही आणि एक मोठा अनर्थ टळला.
ही घटना रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली, जेव्हा स्थानकावर प्रवाशांची वर्दळ कमी असते. पण, हीच दुर्घटना जर दिवसा, गर्दीच्या वेळी घडली असती तर? दिवसा रेल्वे स्थानकावर प्रवाशांची, रिक्षाचालकांची आणि सामान्यांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असती आणि खूप मोठे नुकसान सहन करावे लागले असते!



