रत्नागिरी: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने एक अधिसूचना जारी केली आहे. रविवार, ३ ऑगस्ट, २०२५ रोजी श्री. रत्नागिरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मारुती मंदिर यांच्या वतीने गणपती मूर्तीची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजल्यापासून साळवी स्टॉप ते मारुती मंदिर या मार्गावर ही मिरवणूक निघेल. या मिरवणुकीत राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, तसेच इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांसह सुमारे २५०० लोकांचा जनसमुदाय सहभागी होण्याची शक्यता आहे. यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते, अशी शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने वाहतूक मार्गात तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा आणि मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार हे आदेश जारी केले आहेत. ३ ऑगस्ट, २०२५ रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत हे बदल लागू असतील. यानुसार, साळवी स्टॉप ते माळनाका ओव्हर ब्रीज (डावी बाजू) दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या मार्गावरील वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून साळवी स्टॉप – नाचणे लिंक रोड – आय.टी.आय – अभ्युदय नगर – पॉवर हाऊस – गजानन महाराज मंदिर – हिंदू कॉलनी मार्गे थिबा पॅलेस रोड ते माळनाका रेस्ट हाऊस असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
मात्र, ही अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि शासकीय वाहनांना लागू होणार नाही. तसेच, निकडीच्या आणि अत्यावश्यक प्रसंगी घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस अधिकारी योग्य तो निर्णय घेतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या अधिसूचनेबद्दल वाहनचालक किंवा इतर नागरिकांना काही आक्षेप असल्यास, त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



