Friday, March 20, 2026

Latest Posts

लाखोंच्या उपस्थितीत साक्षात परमेश्वराचे थाटामाटात लग्न  श्री देव मार्लेश्वर – गिरीजादेवीच्या विवाहाचा अभूतपूर्व उत्साह

संगमेश्वर : सह्याद्रीच्या पर्वतराजीत वसलेल्या मारळ नगरीत बुधवारी (१४ जानेवारी) दुपारी १२.३० च्या मुहुर्तावर “आली लग्न घटी समीप नवरा घेऊनिया… वाजंत्री बहु गलबला न करणे”चे सूर उमटले आणि उपस्थित लाखो भाविकांनी मंत्राक्षता टाकत साक्षात परमेश्‍वराचेच लग्न लावण्याचा योग साधला.

अखंड राज्यातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव मार्लेश्‍वरचा विवाह बुधवारी दुपारी सनई चौघड्यांच्या सुरात आणि मंगलाष्टका मंत्रोपचारांच्या मंगलमय वातावरणात कोंडगावची श्री देवी गिरीजा हिच्याबरोबर थाटात विवाह संपन्न झाला. देवांचे लग्न याची डोळा साठवण्यासाठी हजारो भाविकांनी सह्याद्रीच्या कपारीतही  मकरसंक्रांतीचा अपूर्व योग साधला.

आंगवली येथील मूळ मठात विवाहापूर्वीचे सर्व विधी झाल्यावर मंगळवारी रात्री विडे भरण्यासह महाप्रसाद, नवस बोलणे, नवस फेडणे असे विधी उरकून श्री देव मार्लेश्‍वरची मूर्ती; चांदीचा टोप प्रथेप्रमाणे सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आला. याचबरोबर गंगामाता आणि मल्लिकार्जुनाची मूर्तीही पालखीत स्थानापन्न झाली. त्यानंतर आंबवची दिंडी, वांझोळेची कावड, देवरुखची दिंडी, विवाहसोहळ्याचे यजमानी वाडेश्‍वर देवाची पालखी आदींचे मानकरी व भाविकांसह आंगवली मठात आगमन झाले. मंगळवारी मध्यरात्री बरोबर १२ वाजता हर हर मार्लेश्‍वरचा जयघोष करीत हा सारा लवाजमा मार्लेश्‍वर शिखराकडे निघाला. ढोल, ताशे, गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीत श्री देव मार्लेश्‍वरची पालखी मार्गस्थ झाली.

पालखी वाहण्याचा मान प्रथेप्रमाणे भोई समाजाचा होता तर सोबत मशालजी म्हणून चर्मकार बंधू, मारळचे सुतार, अबदागीर, कासारकोळवणचे ताशेवाले, चौरी, न्हावी बंधू याचप्रमाणे मानकरी आंगवलीचे अणेराव बंधू आदींसह हजारो भाविक यामध्ये सहभागी झाले होते. शिखराच्या पायथ्याजवळ असलेल्या पवईच्या पायरीवर हा सारा लवाजमा आणि साखरप्याहून आलेल्या वधू गिरिजादेवीची पालखी उत्तररात्रीनंतर एकत्र आल्यावर हर हर महादेवाच्या जयघोषाने सारा सह्याद्री दुमदुमून गेला. शिखरावर पोचल्यावर तीनही पालख्यांचे प्रथेप्रमाणे पारंपरिक स्वागत करण्यात आले. 

तीनही पालख्या नियोजित ठिकाणी वस्तीला गेल्या. सोबत मानकरीही होतेच. पहाटे मुलीचे घर पाहणे, मागणी टाकणे, मुलाचे घर पाहणे, पसंती, ठरावनामा, कल्याणविधीची वेळ ठरवणे असे विधी झाले. दुपारी १ वाजता विवाहासाठी ३६० मानकर्‍यांना रीतसर निमंत्रण देण्यात आले. दुपारी १२ वाजून ३० मिनिटांच्या मुहुर्तावर श्री देव मार्लेश्‍वर आणि गिरिजादेवीचे लग्न लावण्यात आले. यासाठी आधीच हिंदू धर्मातील लिंगायत धर्मीय शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करण्यात आली होती. यावेळी करवलीचा मान प्रथेप्रमाणे गोठणे गावाकडे होता. मंगलाष्टका आणि मंत्रोच्चारांच्या मंगल वातावरणात रायपाटणकर स्वामी यांच्या पौरोहित्याखाली हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.