रत्नागिरी: व्यक्तिमत्त्व विकासासाठी खेळ आवश्यक असून आवडीच्या खेळाशी नाते जोडा आणि खेळातून आनंद मिळवा. असे प्रतिपादन दि न्यू एज्युकेशन सोसायटी रत्नागिरीच्या फाटक हायस्कूल, श्रीमान वि.स.गांगण कला, वाणिज्य व कै. त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष, सायकलिस्ट मा. महेश निशिकांत सावंत यांनी केले.
फाटक हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा शानदार शुभारंभ प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते ध्वज फडकवून आणि श्रीफळ वाढवून हर्षल्हासात संपन्न झाला. याप्रसंगी पाहुण्यांच्या उपस्थितीत खेळाडूंना क्रीडा शपथ देण्यात आली. मुख्याध्यापक राजन कीर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना विद्यार्थ्यांनी खिळाडू वृत्तींचे प्रदर्शन करावे असे शुभेच्छापर मनोगतातून सांगितले. तसेच उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी यांनी विद्यार्थ्यांनी सुरक्षित व मैत्रीपूर्ण खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. उद्घाटन प्रसंगी पर्यवेकक्षिका नेहा शेट्ये , शालेय स्वराज्य सभा मुख्यमंत्री आणि दोन्ही सत्रातील विद्यार्थी क्रीडा प्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते.
तीन दिवस चालणाऱ्या आणि विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव असलेल्या या क्रीडा महोत्सवात सकाळ आणि दुपार सत्रातील विद्यार्थ्यांसाठी कॅरम, व्हॉलीबॉल, कबड्डी, रस्सीखेच, खोखो,८०×४ रिले अशा विविध वैयक्तिक आणि सांघिक खेळांचा समावेश असून सर्व विद्यार्थ्यांचा खेळात किंवा क्रीडा स्पर्धांच्या व्यवस्थापनात सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने क्रीडा महोत्सवाचे नियोजन शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख मंदार सावंत, क्रीडा शिक्षिका बेबीताई पाटील, व अन्य क्रीडाशिक्षक यांनी केले आहे. खेळाच्या निकोप परीक्षणासाठी शाळेचे माजी विद्यार्थी आणि प्रशिक्षित पंच या सामन्यांसाठी पंच म्हणून निमंत्रित करण्यात आले आहेत. याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन आरती पाथरे आणि अनिल आग्रे यांनी केले. आभार रमेश काटकर यांनी मानले.



