Saturday, February 14, 2026

Latest Posts

चिपळूणच्या लेकीचं आकाशातील शेवटचं उड्डाण; गुजरात विमान अपघातात अपर्णा महाडिक यांचा दुर्दैवी अंत

चिपळूण: कोकणच्या मातीतून आकाशात उंच भरारी घेणाऱ्या आणि एअर इंडियामध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत असलेल्या चिपळूण तालुक्यातील धामेली (भोजनेवाडी) येथील सुपुत्रवधू अपर्णा महाडिक (वय ३५) यांचे गुरुवारी गुजरातमध्ये झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांच्या अकाली निधनाने कोकणने एक जबाबदार, कर्तव्यनिष्ठ आणि धडाडीची कन्या गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांच्या पत्नी असलेल्या अपर्णा महाडिक, गेल्या अनेक वर्षांपासून एअर इंडियामध्ये सेवा देत होत्या. गुरुवारी नेहमीप्रमाणे ड्युटीवर असताना, तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या विमान अपघातात त्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांचे पती अमोल महाडिक हे देखील एअर इंडियामध्येच कार्यरत आहेत.
अपर्णा यांच्या अपघाती निधनाची बातमी कळताच महाडिक कुटुंबियांवर, नातेवाईकांवर आणि सहकाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. त्यांची विनम्रता, समजूतदारपणा आणि व्यावसायिकता यासाठी त्या परिचित होत्या. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण कोकण हळहळला आहे.

धामेली गावातही या बातमीने शोकसंतप्त वातावरण निर्माण झाले असून, गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्यविधीबद्दलची माहिती लवकरच नातेवाईकांकडून जाहीर करण्यात येणार आहे.

या दुर्दैवी घटनेवर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी अपर्णा महाडिक यांच्या निधनावर शोक व्यक्त करत म्हटले, “अपर्णा महाडिक यांच्या अपघाती निधनाने रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांनी एक जबाबदार, कर्तबगार महिला गमावली आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती मी मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो.”

हा अपघात केवळ एका कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण कोकणसाठीच एक मोठा धक्का देणारी घटना ठरली आहे. अपर्णा महाडिक यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.