Tuesday, September 29, 2026

Latest Posts

डी.जे. सामंत महाविद्यालयामध्ये तृतीय वर्ष कला व वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न

डी. जे. सामंत महाविद्यालयातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये संस्थेचे उत्तम कार्य – राजेंद्रप्रसाद मसूरकर


पाली – डी.जे. सामंत महाविद्यालयामध्ये तृतीय वर्ष कला व वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष महेश सामंत, प्रमुख पाहुणे राजेंद्रप्रसाद मसुरकर, सचिन कारेकर, आबलोली (गारवा कृषी पर्यटन केंद्राचे मालक), महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कांता कांबळे, इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका नूतन कांबळे, सचिन सावेकर, संदेश चव्हाण, प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थित होते.
सदिच्छा समारंभाचे अध्यक्ष व संस्थेचे उपाध्यक्ष महेश सामंत यांनी जे विद्यार्थी महाविद्यालयातून उच्चशिक्षण घेऊन बाहेर पडतील त्या विद्यार्थ्यांनी समाजामध्ये आदर्शव्रत कार्य करावे. जेणेकरून त्या विद्यार्थ्यांची ओळख निर्माण होईल व त्यामुळे त्याचा स्वतःचा गौरव, त्याच्या आई-वडिलांचा गौरव व त्याच बरोबर महाविद्यालयाचाही गौरव होईल अशा प्रकारचे कार्य विद्यार्थ्यांकडून घडावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
*राजेंद्रप्रसाद मसूरकर यांचे करिअर गायडन्सवर मोलाचे मार्गदर्शन-*
तृतीय वर्ष कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभाला करिअर गायडन्स करण्यासाठी राजेंद्रप्रसाद मसूरकर यांनी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे की जेणेकरून महाविद्यालयाचा विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत होऊ शकेल.
*सचिन कारेकर गारवा कृषी पर्यटन केंद्र संचालक पर्यटनातून रोजगार निर्मिती यावर मार्गदर्शन -*
या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे, गारवा कृषी पर्यटन केंद्राचे संचालक सचिन कारेकर यांनी सरकारी नोकरी बरोबरच आपल्या कोकणातील निसर्ग सौंदर्याचा फायदा घेऊन जास्तीत जास्त लोकांना कोकणात पर्यटक म्हणून येण्यासाठी प्रवृत्त करावे. त्यातून रोजगाराची मोठी संधी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकेल असे मत व्यक्त केले.
*डी.जे.सामंत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी (कोकण रेल्वेचे टी.सी., पोलिस विभागात कर्तव्य बजावत असेलेले, आणि प्राध्यापक म्हणून सेवेत असणारे) यांचा सत्कार -*
सदिच्छा समारंभाच्या निमित्ताने डी.जे. सामंत महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेले व  वेगवेगळ्या सरकारी नोकरीमध्ये कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. शिक्षण क्षेत्रातल सर्वोच्च पदवी पीएच.डी. प्राप्त केलेला व प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेला महाविद्यालयाचा  माजी विद्यार्थी गुरुप्रसाद घाडी, रेल्वेमध्ये वरिष्ठ टी.सी. पदावर कार्यरत असलेला सचिन सावेकर व संदेश चव्हाण, पोलीस खात्यात कर्तव्य बजावत असलेला राजेंद्र शिंदे या माजी विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या जडणघडणीमध्ये महाविद्यालयाचा मोठा वाटा असल्याचे मनोगत व्यक्त केले. शिक्षण पूर्ण करून आता स्पर्धेच्या जगात येणाऱ्या या विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श समोर रहावा व त्यांना देखील अशा पद्धतीने काम करण्याची प्रेरणा मिळावी संस्थेचा हाच उद्देश या विद्यार्थ्यांच्या सत्कारामागे होता.
या  कार्यक्रम प्रसंगी श्री. राजेंद्रप्रसाद मसुरकर लिखित  *भाषांतर: कौशल्य आणि शास्त्र* या पुस्तकाचे प्रकाशन गारवा कृषी पर्यटन केंद्रांचे संचालक श्री. सचिन कारेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
*विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या भावना -*
तृतीय वर्ष कला व वाणिज्य शाखेच्या सदिच्छा समारंभानिमित्त विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यामध्ये महाविद्यालयाचा जी.एस. पूर्वेस तांदळे, विद्यार्थिनी प्रतिनिधी सृष्टी सरफरे, द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी सिमरन सावंत, प्रथम वर्ष कला शाखेचा पारस शिंदे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयात विविध विभागांच्यावतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जडणघडण होते. महाविद्यालयात शिक्षणाबरोबरच विविध विभागांच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभाग घेता आल्याने विद्यार्थ्यांमध्ये कला गुण विकसित झाल्यामुळे समाजात वावरताना आत्मविश्वास निर्माण झाल्याचे मत विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
आजच्या या सदिच्छा कार्यक्रमामध्ये महिला विकास कक्षाकडून घेण्यात आलेल्या ” राखी मेकींग(तयार करणे) या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्या पाली बाजारपेठेत विक्री करून आलेल्या रकमेतून विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी सदिच्छा म्हणून पेन वाटप करण्यात आले. याच लेखणीतून त्यांनी आपल्या आयुष्याला योग्य आकार द्यावा हा संस्थेचा हेतू होता.
डी.जे. सामंत महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या तृतीय वर्ष कला व वाणिज्य शाखेच्या सदिच्छा समारंभाचे प्रास्ताविक डॉ. कांता कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीणा शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रथम व द्वितीय वर्ष कला व वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी केले होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.