Sunday, September 13, 2026

Latest Posts

कोकणातील निसर्ग व जैवविविधतेवर विद्यार्थ्यांनी संशोधन करावे: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

निसर्ग अभ्यासक्रमासाठी जिल्हा नियोजन व सिंधुरत्न योजनेतून निधी देणार
सात्विणगाव (खेड) येथे निसर्ग माहिती केंद्राचे उद्घाटन
रत्नागिरी : कोकणातील निसर्ग, जैवविविधता आणि स्थानिक वनसंपदेवर विद्यार्थ्यांनी सखोल संशोधन करणे गरजेचे आहे. अशा अभ्यासासाठी संस्थांनी पुढाकार घेऊन स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू केल्यास, त्यांना जिल्हा नियोजन समिती तसेच ‘सिंधुरत्न’ योजनेतून आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही उद्योग तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.*
   खेड तालुक्यातील सात्विणगाव येथे वन विभागाच्यावतीने उभारण्यात आलेल्या ‘निसर्ग माहिती केंद्रा’चे उद्घाटन कोनशिलेचे अनावरण व फीत कापून डॉ. सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने वड पूजनाने झाली.
   याप्रसंगी माजी आमदार संजय कदम, विभागीय वन अधिकारी गिरजा देसाई, प्रांताधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार सुधीर सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य राजू आंब्रे, संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर दिवाले, शशिकांत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
संशोधनाला पेटंट मिळवण्याचे आवाहन
   कोकणातील एका विद्यार्थ्याने स्थानिक नाचणी पिकावर संशोधन करून पी.एच.डी.सह पेटंट मिळवल्याचा दाखला देत पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, “आपल्या निसर्गरम्य परिसरावरही उच्च दर्जाचे संशोधन होऊ शकते. रत्नागिरीच्या वनसंपदेचा व वन्यजीवांचा शास्त्रीय अभ्यास करण्याची मोठी संधी विद्यार्थ्यांसमोर आहे.”
माहिती केंद्र हे संशोधनाचे दालन बनावे
   निसर्ग माहिती केंद्र केवळ पर्यटनापुरते मर्यादित न राहता ते प्रत्यक्ष शिकवणारे आणि संशोधनाला गती देणारे केंद्र व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत ते पुढे म्हणाले, “सह्याद्रीच्या खोऱ्यातील पट्टेरी वाघ, बिबट्या, ब्लॅक पँथर यांसारख्या वन्यजीवांची वैशिष्ट्ये, त्यांची भ्रमणक्षमता व अधिवास यामागे मोठे विज्ञान आहे. हे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.”
वन विभागाचे कौतुक
हे माहिती केंद्र उभारल्याबद्दल पालकमंत्री डाॕ सामंत यांनी विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड आणि संपूर्ण वन विभागाच्या टीमचे विशेष कौतुक केले. या केंद्रामुळे नागरिक व पर्यटकांना जैवविविधतेची माहिती मिळून संशोधनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांनी केले, तर आभार सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड यांनी मानले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.