रत्नागिरी : ‘नीट-युजी २०२६’ (NEET-UG) परीक्षेत एस.टी. प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम आणि देशात चौथा क्रमांक पटकावून रत्नागिरीचे नाव उज्ज्वल करणाऱ्या भावेश सुरेश चव्हाण याचा आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. भावेशने मिळवलेले हे यश रत्नागिरी जिल्ह्यासाठी अत्यंत भूषणावह असून, त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
भावेशच्या या यशाची दखल घेत शिवसेना (उबाठा) पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आज त्याची भेट घेतली. त्याच्या निवासस्थानी जाऊन शाल आणि वृक्षारोपणाचा संदेश देणारे रोप देऊन त्याला भावी वैद्यकीय प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कौतुक सोहळ्याप्रसंगी भावेशच्या माता-पित्यांचाही सन्मान करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी शहर प्रमुख श्री. प्रशांत साळुंखे, युवासेना जिल्हाप्रमुख श्री. प्रसाद सावंत, नगरसेवक श्री. केतन शेट्ये, श्री. अमित विलणकर आणि उपशहर प्रमुख श्री. सलील डाफळे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रशांत साळुंखे यांनी सांगितले की, भावेशने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत राष्ट्रीय पातळीवर मिळवलेले हे यश इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. भावेशने आपल्या यशाचे श्रेय कुटुंबिय आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिले असून, भविष्यात उत्तम डॉक्टर होऊन देशाची सेवा करण्याचा मानस व्यक्त केला आहे.



