Thursday, July 23, 2026

Latest Posts

रत्नागिरीत काढलेल्या मोर्चात विद्यार्थी जबरदस्तीने आणल्याचा महायुतीचा आरोप


रत्नागिरी : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ शहरात आज (२३ जुलै) काढण्यात आलेल्या मोर्चात काही शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना जबरदस्तीने आणल्याचा आरोप करत दोषींवर कडक कारवाईची मागणी शिवसेना-भाजप महायुतीने केली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयात आयोजित विशेष पत्रकार परिषदेत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी हा मोर्चा विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी होता की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात राजकीय षड्यंत्र रचण्यासाठी, असा थेट सवाल उपस्थित केला आहे.
देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यासाठी आज रत्नागिरीतील महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थी, नागरिक हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले होते; मात्र या मोर्चावरून आता स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष तथा भाजपचे नेते समीर तीवरेकर, भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे, सचिन वहाळकर, सरचिटणीस ओंकार फडके यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली.
केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगत, “नीट” परीक्षेतील अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले असून, बाधित विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र स्तरावर विविध पर्यायांवर विचार सुरू असल्याची माहिती महायुतीने दिली.
ज्या शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना या राजकीय आंदोलनात ढकलले, त्यांच्यावर तात्काळ व कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका पालकमंत्र्यांच्या वतीने महायुतीने घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी महायुतीचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन देणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करणाऱ्या आणि देशप्रमुखांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या घटकांविरोधात रितसर कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.