रत्नागिरी : एकात्मिक बालविकास सेवा योजना चिपळूण-१, बीट दादर-२ अंतर्गत अलोरे येथे ९ वा राष्ट्रीय पोषण माह आणि ‘सेवा संकल्प अभियान’ कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व आयसीडीएस (ICDS) स्थापना दिनही साजरा करण्यात आला. या अभियानांतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने ‘लेक लाडकी योजना’, ‘प्रधानमंत्री मातृवंदन योजना’ तसेच ‘बेबी केअर किट वाटप’ योजनांचा समावेश होता. या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत कसा पोहोचवावा, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान महिला व बालकांच्या उत्तम आरोग्यासाठी पोषणयुक्त आहाराचे महत्त्व पटवून देण्यात आले. जनजागृतीचा भाग म्हणून पोषक तृणधान्ये व भाज्यांवर आधारित आकर्षक पाककृती प्रदर्शन, पोषणविषयक रांगोळी प्रदर्शन आणि जनजागृतीपर गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. या उपक्रमांना उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषद सदस्य विनयाताई झगडे व पंचायत समिती सदस्य विनोद झगडे उपस्थित होते. याशिवाय बीट पर्यवेक्षिका मनिषा चिपळूणकर, आरोग्य विभागाचे CHO श्री. होळकर, आरोग्य सेविका श्रीम. म्हाप्दी, शाळेचे शिक्षक श्री. गुडूकडे, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, माता-पालक, किशोरी मुली व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



