Thursday, November 5, 2026

Latest Posts

पोयनार लघुपाटबंधारे प्रकल्पाचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन

२६५ कोटी ४८ लाखांचा निधी मंजूर ;१४ गावांच्या पाण्याची प्रतीक्षा संपणार
रत्नागिरी : २५ वर्षांपासून रखडलेल्या खेड तालुक्यातील धरण प्रकल्पाच्या कामाला अखेर गती मिळाली असून, २६५ कोटी रुपयांच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचे (सुप्रमा) भूमिपूजन संपन्न झाले आहे. या प्रकल्पामुळे पुढील दोन वर्षांत परिसरातील १४ गावांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याचे महसूल राज्य मंत्री योगेश कदम म्हणाले.
  खेड तालुक्यातील पोयनार येथे लघु पाटबंधारे प्रकल्पाचे भूमिपुजन गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज,  अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री श्री. कदम यांच्या हस्ते आज झाले. ते म्हणाले, या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता २७.८९९ दशलक्ष घनमीटर इतकी विस्तीर्ण असून, याद्वारे १४ गावांना जीवनदान मिळणार आहे. “गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून या प्रकल्पासाठी अखंड पाठपुरावा सुरू होता. पुढील दोन वर्षांच्या कालावधीत सर्व संबंधित गावांना प्रत्यक्ष पाणी उपलब्ध करून देणे हेच आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे,” असा निर्धार त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.
  या प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे जाहीर आभार मानले. कोकणातील सिंचन क्रांतीचा उल्लेख करताना, “मांडवे धरणासाठीही सुमारे २०० कोटींचा निधी मंजूर झाला असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांतील रखडलेले सर्व जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही
   धरण बांधकामासोबतच प्रकल्पग्रस्तांच्या हिताची पूर्ण काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही देताना राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, “धरणाच्या बांधकामासोबतच बाधितांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया समांतरपणे राबवली जाईल. कोणत्याही शेतकरी किंवा प्रकल्पग्रस्तावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही.”
   या भूमिपुजन प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, माजी गृहमंत्री रामदास कदम, माजी आमदार संजय कदम यांच्यासह विविध क्षेत्रांतील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.