रत्नागिरी : सिंधुदुर्गमधून रत्नागिरीकडे येणाऱ्या कारचा अपघात रत्नागिरी-पाली मार्गावरील हातखंबा टॅप जवळ दुपारच्या सुमारास झाला. मार्गफलक न दिसल्याने कारने अचानक रस्त्यावरील कठड्याला धडक दिली आणि गाडी रस्त्यावर पलटी होऊन जागेवरच पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने, या भीषण अपघातात गाडीतील लहान मुलीसह वडिल असे दोघे जण बचावले आहेत.रस्त्यावरील मार्ग बदलल्याचे फलक स्पष्टपणे न दिसल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावर तातडीने स्पष्ट फलक लावण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मिहिर मुरलीधर प्रभुदेसाई (वय ३९, सिंधुदुर्ग) हे आपल्या ताब्यातील (MH-07 Q 8032) क्रमांकाची कार घेऊन रत्नागिरीत येत होते. हातखंबा- पाली परिसरात रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे मार्गात बदल करण्यात आलेला आहे. मात्र, चालकाला रस्त्यावरील मार्ग बदलाचा सूचना देणारा बोर्ड दिसला नाही. यामुळे ताबा सुटला आणि भरधाव वेगातील गाडी थेट समोर असलेल्या दगडाच्या कठड्यावर जोरदार आदळली. गाडी जागेवरच पलटी झाली आणि काही क्षणातच गाडीने पेट घेतला. या अपघातात चालक डॉ. मिहिर प्रभुदेसाई जखमी झाले. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी किरकोळ जखमी झाली. आता दोघेही सुखरूप आहेत. अपघातामुळे मार्गावर मोठी गर्दी झाली. या गाडीत एकूण दोन जण प्रवास करत होते. दैव बलवत्तर म्हणून त्यांना दोघांनाही गंभीर इजा झाली नाही आणि ते सुखरूप बचावले.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने पाण्याचे फवारे मारून गाडीला लागलेली आग विझवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे पुढील अनर्थ टळला. या अपघातामुळे रत्नागिरी-पाली मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.



