Wednesday, April 15, 2026

Latest Posts

गणपतीपुळेच्या ‘श्रीं’चे २३ हजार पर्यटकांनी घेतले दर्शन

रत्नागिरी : बहुतांश खासगी शाळांच्या परीक्षा संपल्या असून, महाविद्यालयांनाही सुट्ट्या पडल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांची पावले कोकणाकडे वळू लागली आहेत. गेले काही दिवस व्यावसायिक सिलिंडरच्या टंचाईमुळे पर्यटकांची संख्या कमी झाली होती. मात्र, शनिवार, रविवार सुटीमुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे. गेल्या दाेन दिवसांत गणपतीपुळे येथील ‘श्रीं’चे तब्बल २३ हजार पर्यटकांनी दर्शन घेतले.
रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनासाठी येणारे पर्यटक गणपतीपुळेला भेट देऊन ‘श्रीं’चे दर्शन घेतात. शनिवारी ११,४८५ तर रविवारी १२ हजार पर्यटकांनी ‘श्रीं’चे दर्शन घेतले. ‘श्रीं’च्या दर्शनानंतर पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारत असून, या ठिकाणी घोडागाडी, उंट सवारी करून वाॅटर स्पोर्ट्सचा आनंद घेतात. पर्यटकांच्या आगमनामुळे समुद्रकिनाऱ्यावरील छाेट्या व्यावसायिकांना फायदा हाेत आहे.

गणपतीपुळेसह मालगुंड, वरवडे, काजिरभाटी, आरे-वारे किनाऱ्यांना भेटी देऊन पूर्णगड, गावखडी, कशेळी, आडिवरे या ठिकाणांना भेटी देऊन पर्यटक पुढे जात आहेत. कोकण रेल्वे, खासगी बसेस, एसटी त्याशिवाय खासगी वाहनांनी येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. काही पर्यटक गणपतीपुळे करून जयगड मार्गे गुहागरला जात आहेत तर काही फुणगूस मार्गे संगमेश्वर करून मुंबईला परत फिरत आहेत.
……

दापोली, गुहागरातही पर्यटकांची गर्दी
दापोली, हर्णै, आंजर्ले, मुरूड, पाळंद, कर्दे या ठिकाणी पर्यटक हजेरी लावत आहेत. तसेच गुहागरातील हेदवी, गुहागर समुद्र किनारा, वेळणेश्वर, असगोली, वेलदूर-नवानगर, धोपावे या ठिकाणांनाही पर्यटकांची पसंती मिळत आहे.

…………
चुलीवरील जेवणाचा आस्वाद

व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्यामुळे हाॅटेल, खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी चुली पेटविल्या आहेत. काही हाॅटेलचालकांनी तर चुलीवरचे जेवण मिळेल असा बोर्डच लावल्यामुळे पर्यटक चुलीवरच्या पदार्थांचा आस्वाद घेत आहेत.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.