रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री व मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ उदय सामंत आणि लांजा-राजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना आधुनिक, सुलभ आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ६ मध्ये NCMC कार्ड नोंदणी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना नगरसेविका सौ. मेधा अविनाश कुळकर्णी यांच्या सौजन्याने तसेच शिवसेना नगरसेवक श्री. राजीव यशवंत कीर यांच्या सहकार्याने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे रविवारी (२३ ऑगस्ट) हे शिबिर उत्साहात पार पडले. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
१८५ नागरिकांनी केली नोंदणी
या विशेष शिबिरामध्ये प्रभाग क्रमांक ६ मधील तब्बल १८५ नागरिकांनी NCMC कार्डसाठी नोंदणी करून सहभाग नोंदविला. यामध्ये ६० मुली, ८० महिला आणि ४५ पुरुषांचा समावेश होता.
NCMC कार्डच्या माध्यमातून बस प्रवासाचे तिकीट खरेदी अधिक सुलभ, सुरक्षित आणि स्मार्ट पद्धतीने करता येणार असून, पेमेंट व प्रवासासाठी एकाच कार्डचा वापर करता येणार आहे.
नगराध्यक्षांच्या उपस्थितीत शुभारंभ
शिबिराच्या शुभारंभप्रसंगी रत्नागिरीच्या नगराध्यक्ष सौ. शिल्पाताई सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. नगराध्यक्ष सौ. शिल्पाताई सुर्वे यांचे विभाग प्रमुख श्री. मनोज साळवी व उपविभाग प्रमुख श्री. नरेंद्र देसाई यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी NCMC कार्ड समृद्धी सर्विसेसचे श्री. संदीप चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले. तसेच सौ. स्नेहा चव्हाण यांचे सौ. सोनाली सावंत यांनी, तर मैथिली भोसले यांचे सौ. विशाखा भिडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
पाच वर्षांची वैधता; गरजेनुसार करा रिचार्ज
यावेळी मनोगत व्यक्त करताना नगरसेविका सौ. मेधा अविनाश कुळकर्णी यांनी NCMC कार्डच्या सुविधेबाबत नागरिकांना माहिती दिली. त्या म्हणाल्या की, NCMC कार्डची वैधता पाच वर्षांची असून कार्डसाठी दर महिन्याला रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही. नागरिकांनी जेव्हा प्रवास करायचा असेल, तेव्हा आपल्या गरजेनुसार कार्डमध्ये रक्कम रिचार्ज करावी. ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासासाठी सवलत मिळावी यासाठी हे कार्ड असणे महत्त्वाचे आहे या कार्डमध्ये शंभर रुपयापासून ते तीन हजार रुपये पर्यंत रिचार्ज करू शकता ज्यावेळी प्रवास करणार त्याचवेळी तिकिटाचे पैसे कट होणार आहेत
रिचार्जची सुविधा एस.टी. बसच्या कंडक्टरकडून, एस.टी. बसस्थानकावर, G-Payच्या माध्यमातून तसेच समृद्धी सर्विसेससारख्या अधिकृत एजन्सींकडून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या सोयीने कार्ड रिचार्ज करता येणार आहे.
हे कार्ड ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी विशेष उपयुक्त असून, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के तिकीट माफी, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के तिकीट माफी, तसेच महिला सन्मान योजनेअंतर्गत पात्र महिलांना ५० टक्के तिकीट सवलत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुमारे महिनाभरानंतर मिळणार NCMC कार्ड
या शिबिरात नोंदणी केलेल्या प्रत्येक नागरिकाला नोंदणीची पावती देण्यात आली आहे. नोंदणी केल्यानंतर सुमारे एक महिन्याने संबंधित नागरिकांचे NCMC कार्ड रत्नागिरी एस.टी. बसस्थानकातील चौकशी खिडकीच्या बाजूला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कार्ड घेण्यासाठी सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत सुविधा उपलब्ध राहणार आहे. संबंधित नागरिकांनी कार्ड उपलब्ध झाल्यानंतर निर्धारित वेळेत एस.टी. बसस्थानकावरून आपले कार्ड घेऊन जावे, असे आवाहन नगरसेविका सौ. मेधा अविनाश कुळकर्णी यांनी केले.
नियोजनबद्ध पद्धतीने शिबिराचे आयोजन
शिबिरासाठी नागरिकांनी आधारकार्ड व मोबाईलसह स्वतः उपस्थित राहून नोंदणी केली. प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्यासाठी पूर्वनोंदणी व टोकन व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण नोंदणी प्रक्रिया नियोजनबद्ध आणि सुरळीतपणे पार पडली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विभाग प्रमुख श्री. मनोज साळवी, उपविभाग प्रमुख श्री. नरेंद्र देसाई, उपशहर प्रमुख सौ. प्रिया ताई साळवी तसेच श्री. हरिष चौघुले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिवसेना नगरसेविका सौ. मेधा अविनाश कुळकर्णी यांनी प्रभाग क्रमांक ६ मध्ये हा उपक्रम अतिशय नियोजनबद्ध व व्यवस्थितपणे राबविल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे विशेष अभिनंदन व आभार व्यक्त केले.
फोटो कॅप्शन : रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ६ मध्ये आयोजित NCMC कार्ड नोंदणी विशेष शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे, नगरसेविका सौ. मेधा अविनाश कुळकर्णी, नगरसेवक श्री. राजीव यशवंत कीर तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



