चिपळूण: आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एक तुकडी शुक्रवारी सायंकाळी उशिरा चिपळूणमध्ये दाखल झाली आहे. या पथकामध्ये ३ अधिकारी, २३ जवान आणि ३ चालकांचा समावेश असून, हे पथक पावसाळा संपेपर्यंत चिपळुनातच मुक्कामी राहणार आहे. चिपळूण शहरासह ग्रामीण भागाला २६ जुलै २००५ आणि २१ जुलै २०२१ रोजी बसलेल्या भीषण अतिवृष्टी व पुराच्या फटक्यामुळे चिपळूणवासियांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्या पूरपरिस्थिती दरम्यान वाहतुकीतील अडथळ्यांमुळे एनडीआरएफचे पथक उशिरा पोहोचले होते, तरीही त्यांनी नंतर आपली कामगिरी चोख बजावली होती. अशा विलंबाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी गेल्या वर्षापासून एनडीआरएफची तुकडी जुलै महिन्यातच चिपळूणमध्ये तैनात केली जात आहे. दरम्यान, चिपळूणमध्ये दाखल होताच या पथकाने प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे आणि चिपळूण नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी मंगेश पेढांबकर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांसमवेत शहरातील संभाव्य पूर येणाऱ्या अतिसंवेदनशील भागांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.



