Saturday, May 2, 2026

Latest Posts

अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय सुवर्ण महोत्सवानिमित्त कार्यवाह सतीश शेवडे यांचे मनोगत


       रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी आपल्या भरीव शैक्षणिक कार्यामुळे फक्त कोकणातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात नावलौकिकास पात्र ठरली आहे. या संस्थेचे संस्थापक कै. बाबुराव जोशी आणि सौ. मालतीबाई जोशी यांनी १९२५ साली फक्त तीन विद्यार्थिनींना बरोबर घेऊन महिला विद्यालयाची स्थापना केली. या विद्यालयाचा नुकताच शताब्दी सोहळा पार पडला. जोशी दांपत्याला हे विद्यालय सुरू करताना नक्कीच अनेक सामाजिक, आर्थिक प्रश्नांचा सामना करावा लागला पण या जिद्दी दांपत्याने रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून या शैक्षणिक रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर केलं. अनेक रूढी परंपरा भेदून स्त्री शिक्षणाची सुरुवात आणि चळवळ त्यांनी रत्नागिरी मध्ये सुरू केली. हा शैक्षणिक प्रवास आज शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, विविध व्यावसायिक उपक्रम ,प्रशिक्षण केंद्र मिळून एकूण 22 उपशाखांच्या रूपात  कार्यान्वयीत आहे.यापैकीच एक कै.पी. जी. अभ्यंकर कला व वाणिज्य आणि आर. बी. कुळकर्णी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आहे.
     अर्थातच काळाच्या ओघात नवनवीन शैक्षणिक धोरणांना अनुसरून ,त्या अनुषंगाने स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण आणि अद्ययावत शैक्षणिक सुविधा देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. जगाच्या नकाशावर रत्नागिरीचे नाव ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अष्टपैलू बनवण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधांची आणि कौशल्य पूरक शिक्षणाची उपलब्धता करून देण्यामध्ये रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी सतत प्रयत्नशील आहे. हजारो विद्यार्थ्यांना संस्थेचे हे शैक्षणिक आणि सामाजिक योगदान दरवर्षी कामी येत आहे. कोकणातील विद्यार्थी आपले आदर्श करिअरची स्वप्न पूर्ण करत आहेत.त्यांना आयुष्यात कायमस्वरूपी उपयोगी पडेल असे ज्ञान, विज्ञान, संस्कार आणि शहाणपणाचे धडे इथे दिल्यामुळे त्यांच्या आयुष्याला आपोआपच सोनेरी किनार प्राप्त झाली आहे.
   १९७५ साली १०+२+३ हा नवीन शैक्षणिक आकृतीबंध महाराष्ट्रात लागू झाला आणि १४जून १९७६ रोजी या कनिष्ठ महाविद्यालयाचा जन्म झाला. कला, वाणिज्य, विज्ञान आणि एम.सी.व्ही. सी. असे चार विभाग येथे अतिशय जोमाने कार्यरत आहेत. आज इथे जवळजवळ तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक नामांकित कनिष्ठ महाविद्यालय म्हणून हे प्रसिद्ध आहे. मार्च १९८४ मध्ये सुप्रसिद्ध व्यावसायिक आर. बी. कुलकर्णी यांनी या महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेला  देणगी दिली आणि त्यानंतर आर.बी. कुळकर्णी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय हे नाव याला मिळाले. नंतर १९९५ मध्ये सुप्रसिद्ध आंबा व्यवसायिक अभ्यंकर यांनी कला व वाणिज्य विभागाला देणगी दिली आणि त्यांच्या उदार देणगीमुळे पी. जी.अभ्यंकर कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय असे नामकरण करण्यात आले.
    अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय हे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कॅम्पस मध्ये आहे. त्यामुळे गोगटे जोगळेकर महाविद्यालयासाठी उपलब्ध असलेल्या सर्व भौतिक सुविधांचा या महाविद्यालयाला आपोआपच लाभ मिळतो. सुसज्ज कॉम्प्युटर लॅब्स, उत्तम ग्रंथालय ,सक्षम जिमखाना आणि प्रशस्त क्रीडांगण, सर्व सोयींनीयुक्त असे विद्यार्थिनी वस्तीगृह, अद्ययावत प्रयोग शाळा या सर्व सुविधा कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपोआप उपलब्ध होतात. या भौतिक सुविधा विद्यार्थ्यांसमोर करिअरची अनेक दालने खुली करतात आणि त्यांच्या करिअरचा प्रेरणादायी प्रवास इथून सुरू होतो. कोकणातल्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या आदर्श करिअरची स्वप्न या कनिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून पूर्ण केली आहेत. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सामाजिक योगदानाबद्दल हे सर्व विद्यार्थी खूप कृतज्ञ आहेत ही संस्थेसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.
     महाविद्यालयाच्या संख्यात्मक आणि गुणात्मक विकासाची परंपरा कायम राखण्यासाठी सुरू असलेला रत्नागिरी पॅटर्न, विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अनेक संधी इथूनच उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुरू असलेली सुयश अकॅडमी, अगदी सुरुवातीच्या कनिष्ठ महाविद्यालयीन वयात स्पर्धा परीक्षांची ओळख होऊन अभ्यास करण्याची उमेद निर्माण करणारी अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी, यांचबरोबर रत्नागिरीत राहून विविध परदेशी भाषा शिकण्यासाठी सुरू असलेलं फॉरेन लैंग्वेज सेंटर या आणि अशा कितीतरी गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये लहान वयात शैक्षणिक प्रगल्भता निर्माण करायला मदत करत आहेत.
       रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी द्वारे अगदी बालवाडी पासून ते पी.एच.डी. पर्यंतचे शिक्षण घेण्याची सोय रत्नागिरीमध्ये उपलब्ध आहे. याचबरोबर डेटा सायन्स आणि मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन अर्थातच एम.बी.ए. ह्या आजच्या काळात आवश्यक असलेल्या शिक्षणाची सोय आज गोगटे जोगळेकर महाविद्यालय स्वायत्त इथे उपलब्ध आहे.
    उत्तम शिक्षणासाठी सर्व नावीन्यपूर्ण अद्ययावत सोयी सुविधा पुरवण्याचा सोसायटीचा मानस आहे. विद्यमान कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यादेखील देश विदेशातून मोठया देणग्या प्राप्त करून या स्पर्धात्मक युगात संस्थेला अधिकाधिक सक्षम बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. गोगटे जोगळेकर कॉलेज परिसरात विद्यार्थिनी वसतीगृह, कनिष्ठ महाविद्यालयाची इमारत तसेच महाविद्यालयीन सुसज्ज इमारतीचे कामकाज चालू आहे.
     या सुवर्ण महोत्सव वाटचालीत संस्थेवर प्रेम करणारे दानशूर देणगीदार, सातत्याने सहकार्य करणारे आणि मेहनत घेणारे अनेक हात, आजी-माजी विद्यार्थी, अध्यापक, आजी-माजी पदाधिकारी, सहकारी यांचे मोलाचे योगदान संस्थेच्या प्रगतीमध्ये आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळेच संस्थेला अधिक जोमाने शैक्षणिक कार्य आणि प्रगती करण्यासाठी बळ प्राप्त होत आहे. केवळ अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयेच नव्हे तर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी हे शैक्षणिक संकुल अधिकाधिक बळकट आणि सर्वतोपरी समृद्ध करून आपण सर्वांनी मिळून आदरणीय कै. बाबुराव आणि कै. मालतीबाई जोशी यांच्या कार्यकर्तृत्वाला अधिक झळाळी देऊया.
   कै. पी. जी. अभ्यंकर कला व वाणिज्य आणि आर.बी. कुळकर्णी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या या सुवर्ण महोत्सवानिमित्त संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी, सर्व विद्यार्थी, देणगीदार, अध्यापक वर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी, हितचिंतक यांना मनापासून शुभेच्छा!

श्री. सतीश म. शेवडे
कार्यवाह,
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.