रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात सायबर गुन्हेगारीचा धोका वाढीस लागल्याचे दिसून येत असून, नागरिकांनी बनावट गॅस डिस्ट्रीब्यूशन ॲप्लिकेशनपासून सावध राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बनावट ॲप्सच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याच्या घटना समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांसाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.
गुन्हेगार वर्ग विविध प्रलोभने दाखवून किंवा दिशाभूल करून अनधिकृत ॲप्स डाऊनलोड करण्यास भाग पाडतात आणि त्यानंतर ओटीपी, युपीआय पिन, सीव्हीव्ही तसेच बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवून नागरिकांचे बँक खाते रिकामे करत आहेत. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी नागरिकांनी नेहमी अधिकृत गॅस कंपनीचे अधिकृत ॲप किंवा वेबसाईटचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही एपीके फाईल किंवा अज्ञात व्हॉट्सॲप लिंकवरून गॅस बुकिंगचे ॲप्स डाऊनलोड करू नयेत, जेणेकरून वैयक्तिक माहिती सुरक्षित राहील.
कोणतीही मोबाईल ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यापूर्वी संबंधित पब्लिशर आणि युजर्सचे रिव्ह्यूकस तपासून पाहणे गरजेचे आहे. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक न करण्याचे आणि आपली गोपनीय बँक माहिती कोणाशीही शेअर न करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. विचार करूनच क्लिक करा आणि आपली माहिती हीच आपली जबाबदारी आहे, असे धोरण ठेवून नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना पुरे-पूर काळजी घ्यावी, असा संदेश देण्यात आला आहे. सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी न घाबरता त्वरित नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन रत्नागिरी पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.



