Wednesday, May 13, 2026

Latest Posts

कोकणात भाजप कार्यकर्त्यांची ‘ब्रिगेड’ उभारणार; आ. प्रमोद जठार यांचा निर्धार

रत्नागिरी: “भाजपच्या केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी ही कार्यकर्त्यांचा आमदार म्हणून दिलेली संधी आहे. येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग ते पालघरपर्यंतच्या सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना एकत्र गुंफून कोकणात भाजप कार्यकर्त्यांची एक भक्कम ब्रिगेड तयार करणार,” असा विश्वास भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी येथे व्यक्त केला. रत्नागिरी दौऱ्यावर असताना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाच्या ध्येयधोरणांबाबत बोलताना जठार म्हणाले की, “सत्ता ही युतीमध्ये असते, मात्र पक्ष हा ‘शतप्रतिशत’ विचारानेच चालतो. त्यामुळे संघटना वाढवणे हे माझे प्राथमिक कर्तव्य आहे. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत कोकणातून भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. सरकाराच्या जनहितकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी ही कार्यकर्त्यांची फौज महत्त्वाची भूमिका बजावेल.”

जिल्ह्यातील औद्योगिक प्रकल्पांविषयी भाष्य करताना त्यांनी पर्यावरणाचा मुद्दा अधोरेखित केला. “नाणारनंतर आता बॉक्साईट प्रकल्पाची चर्चा सुरू आहे. मात्र, रत्नागिरी हा पर्यटनासाठी ओळखला जाणारा जिल्हा आहे. बॉक्साईट उत्खननामुळे जमिनी पोखरल्या जातील, परिणामी निसर्गाची हानी होईल. त्यामुळे अशा खनिकर्म उद्योगांना माझा विरोध आहे. जिल्ह्यातील प्रकल्प हे पर्यावरणपूरकच असायला हवेत आणि जनतेच्या विरोधाची दखल सरकार नक्कीच घेईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरीतील समन्वय वाढवल्यानंतर आता जठार रायगड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. कोकण पट्ट्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.