Sunday, May 3, 2026

Latest Posts

झाबुवा येथील खून प्रकरणातील तीन संशयित आरोपींना रत्नागिरीतून अटक; रत्नागिरी पोलिसांची मोठी कारवाई

रत्नागिरी:  मध्यप्रदेशातील झाबुवा जिल्ह्यातील एका खळबळजनक खून प्रकरणातील फरार असलेल्या तीन संशयित आरोपींना अटक करण्यात रत्नागिरी पोलिसांना मोठे यश आले आहे. कोतवाली झाबुवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४०/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे नोंद असलेले हे आरोपी रत्नागिरी शहरात लपून बसले असल्याची माहिती समोर आली होती. या माहितीच्या आधारे रत्नागिरी पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे कारवाई करत या तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.

दाउद चिलिया वाकला, नब्बु चिलिया वाकला आणि चिलिया कलिसींग वाकला (सर्व राहणार झाबुवा, मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १९१(१), १९१(२), १९१(३), १९०, १०३(१), २९६(१) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल आहे. संबंधित गुन्हा घडल्यापासून हे तिन्ही आरोपी फरार होते आणि त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. हे पथक रत्नागिरीत दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली.

पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकातील अंमलदारांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार सापळा रचला आणि आरोपींना ताब्यात घेतले. अटकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी मध्य प्रदेशातील झाबुवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी माईणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, दीपक साळवी, भालचंद्र मयेकर आणि निलेश शिंगावे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या यशस्वी कामगिरीमुळे रत्नागिरी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.