रत्नागिरी – पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशा नंतर आणि ग्रामपंचायत सदस्य सुमित भरत राणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बसणी (खांबतलाव) येथील रखडलेले जलजीवन मिशनच्या विहिरीचे काम अखेर मार्गी लागले आहे. या कामात टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची टांगती तलवार असल्याने, अखेर कामाला सुरुवात करण्यात आली आहे. बसणी येथील जलजीवन मिशन अंतर्गत विहिरीचे काम दीर्घकाळापासून रखडले होते. या भागातील पाणीटंचाई लक्षात घेता, ग्रामपंचायत सदस्य सुमित राणे यांनी या कामासाठी वारंवार पाठपुरावा केला. ग्रामसभा आणि ‘जनता दरबार’मध्येही ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा प्रश्न लावून धरला होता. मात्र, संबंधित ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष करत काम सुरू केले नाही.
कामातील दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या सुमित राणे यांनी २२ मे २०२६ रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत आक्रमक भूमिका घेतली. जो संबंधित ठेकेदार वेळेत काम पूर्ण करत नाहीत, त्यांचा मक्ता रद्द करून त्यांना ब्लॅकलिस्ट करावे, असा ठराव त्यांनी मांडला. या प्रश्नावर तात्काळ तोडगा काढण्यासाठी सुमित राणे यांनी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची कल्पना दिली. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत, पालकमंत्री सामंत यांनी संबंधित यंत्रणेला त्वरित काम सुरू करण्याचे आदेश दिले. पालकमंत्र्यांच्या या आदेशानंतर ठेकेदाराने अखेर विहिरीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
हे काम पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांतूनच मंजूर झाले आहे. ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सुरुवातीपासूनच कटिबद्ध असून, या कामाचा पाठपुरावा स्वतः करत आहोत. त्यामुळे या कामाचे श्रेय कोणीही उगाचच घेऊ नये, असा स्पष्ट इशारा ग्रामपंचायत सदस्य सुमित राणे यांनी दिला आहे.



