Wednesday, May 13, 2026

Latest Posts

सुपरहिरो ऑन व्हिल सायक्लोथॉनला उदंड प्रतिसाद रत्नागिरी सायकलिस्ट क्लब; बेटी बचाओ, बेटी पढाओ चा संदेश

रत्नागिरी: रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित किड्स सायक्लोथॉनला उदंड प्रतिसाद लाभला. रविवारी सकाळी तारांगण ते शांतीनगर या मार्गावर झालेल्या या सायक्लोथॉनमध्ये तब्बल पाचशेहून अधिक बालदोस्तांनी सायकल चालवून जल्लोष केला. सुपरहिरो ऑन सायकल अशा संकल्पनेवर ही सायक्लोथॉन आयोजित केली. महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून या सायक्लोथॉनमध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओचा संदेश मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आला.

तारांगण येथून उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर, हिरो सायकल्सचे एरिया मॅनेजर प्रेम सागर, ज्येष्ठ नगरसेविका स्मितल पावसकर, पूजा पवार, पायल किड्सचे विनोद शाह, क्रेडाईचे वीरेंद्र वणजु आणि मान्यवरांनी झेंडा दाखवला आणि दहा व नंतर पाच किलोमीटरच्या सायक्लोथॉनला प्रारंभ झाला. माळनाका, थिबा पॅलेस रोडमार्गे नाचणे पॉवरहाऊस येथील गजानन महाराज मंदिरला वळसा घालून पाच किलोमीटरचे बालसायकलिस्ट परत आले. दहा किलोमीटरसाठी नाचणे, गोडाऊन व शांतीनगरला वळसा घालून पुन्हा तारांगण येथे सुपरहिरो परतले.

जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या बहुमोल सहकार्याने या सायक्लोथॉनमध्ये बेटी बचाओचा नारा दिला तसेच सर्व सहभागींसह उपस्थित सर्व पालकांनी बेटी बचाओची शपथही घेतली. या उपक्रमाबद्दल पालकांनी खूपच कौतुक केले.

उत्कृष्ट नियोजन, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य, वाहतूक पोलिस आणि जिल्हा प्रशासन, पालकांचे सहकार्य यामुळे या उपक्रमाची चर्चा रंगली. तर सायक्लोथॉन पूर्ण झाल्यानंतर सर्वांना आकर्षक पदक, प्रमाणपत्र व नाश्त्याचे वितरण करण्यात आल्याने सर्व बालदोस्तांना अत्यानंद झाला.

पोदार स्कूलच्या म्युझिकल बॅंडने उत्तम सादरीकरण करत सर्वांची मने जिंकली. सायक्लोथॉनसाठी हिरो सायकल्स व हिंद सायकल ट्रेडिंग कंपनी, सुरस स्नॅक्स पलाश ब्लूम, सुवर्णसूर्य फाउंडेशन, फिनोलेक्स इंडस्ट्रीज, पायल किड्स, क्रेडाई रत्नागिरी आणि फ्लेवर्स बेकरी, रूचकर कोकण व सी फॅन्स हॉटेल यांचे बहुमोल सहकार्य लाभले. जिल्हा शासकीय रुग्णालयाने रुग्णवाहिकेचीही सुविधाही उपलब्ध करून दिली.

बालदोस्तांनी आणलेल्या विविध प्रकारच्या सायकल्सही उत्तम होत्या. सुरक्षिततेसाठी सर्वांनी डोक्यावर हेल्मेट घातले होते. यापूर्वी दोन वेळा सायक्लोथॉनच्या मार्गावर प्रॅक्टिस राईडचे आयोजन केले होते. यामुळे बालदोस्तांचा आत्मविश्वास वाढला.

“रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने अतिशय सुंदर, नेटके व काटेकोर नियोजन केले. यासाठी सर्व सदस्य व कार्यकर्त्यांचे आभार. पदकाचा दर्जा अतिशय छान आहे. वाहतूक व्यवस्था, नाश्ता, हायड्रेशन पॉईंटची व्यवस्था व प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते, पालकांकडून प्रोत्साहन मिळाले. मुलांनी राईड मनसोक्त एंजॉय केली.”
-सुशील साळवी, पालक

“रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने आयोजित केलेला सायक्लोथॉन उपक्रम अत्यंत सुंदर व उत्साहवर्धक ठरला. हा उपक्रम उत्तम नियोजनासह सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेऊन पार पडला. मुलांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला आणि प्रत्येक क्षणाचा अनुभवला. लहान मुलांमध्ये फिटनेसची आवड निर्माण करत आनंदाचा संदेश देणारा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.”
-कौसल्या शेट्ये, पालक.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.