Saturday, April 18, 2026

Latest Posts

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानासाठी रत्नागिरीत भव्य जनजागृती रॅली

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाचा प्रभावी प्रसार करण्यासाठी रत्नागिरी तालुका आरोग्य विभागातर्फे शहरात भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. आरोग्य कर्मचारी, आशा सेविका व नर्सिंग विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रॅलीला मोठा प्रतिसाद लाभला.
मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. त्यानुसार रत्नागिरी तालुक्यात गट विकास अधिकारी चेतन शेळके व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव यांच्या नेतृत्वाखाली, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीचे आयोजन करण्यात आले.
रॅलीची सुरुवात तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातून होऊन जिल्हा शासकीय रुग्णालय व जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे पुन्हा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात समारोप झाला. रॅलीदरम्यान विविध जनजागृती फलक, घोषवाक्ये व संदेशांद्वारे नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी अभियानाची उद्दिष्टे स्पष्ट करत नागरिकांना आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. डॉ. महेश्वरी सातव यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य देण्याचे महत्त्व अधोरेखित केले, तर डॉ. विकास कुमरे यांनी वेळेवर आरोग्य तपासणी करण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असल्याने सर्व ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी मुलींमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या एचपीव्ही लसीबाबत जनजागृती करण्यावर विशेष भर देण्यात आला. लसीकरणाबाबत योग्य माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचेही नमूद करण्यात आले.
या रॅलीत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील राजेश सावंत, सदाशिव वाघमारे, चेतन शेट्ये यांच्यासह कोकणनगर व झाडगाव नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ‘आपला दवाखाना’ येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिकारी व आरोग्य कर्मचारी वर्गानेही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या उपक्रमामुळे रत्नागिरी शहरात आरोग्यविषयक जनजागृतीस मोठा हातभार लागला असून, शासनाच्या आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा दृढ संकल्प यावेळी करण्यात आला.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.