रत्नागिरी : रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी शनिवारी येथील जिल्हा सायबर ठाण्याला भेट देत, तेथील कामकाजाची माहिती घेतली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक स्मिता सुतार तसेच त्यांचे सर्व महिला व पुरुष सहकारी उपस्थित होते. रत्नागिरीतही जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अखत्यारितील सायबर पोलिस ठाणे हे सीसीटीएनएस प्रणालीशी जोडले आहे. त्यामुळे येथे दाखल होणाऱ्या तक्रारी या एनसीआरबी दिल्लीला ऑनलाइन जोडण्यात आल्या आहेत. या सायबर पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्र संपूर्ण रत्नागिरी जिल्हा आहे. हे पोलिस ठाणे आर्थिक फसवणूक होणाऱ्यांसाठी दिलासादायी ठरत असून, फसवणुकीचे गुन्हे, सोशल मीडिया संदर्भातील फसवणुकीच्या तक्रारी दाखल होऊ लागल्या आहेत.
पोलिस अधीक्षक बगाटे यांनी शनिवारी सायबर पोलिस ठाण्याची पाहणी केली. यावेळी सायबर गुन्ह्यांबाबत कशाप्रकारे तपास केला जातो, याची सविस्तर माहिती सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक स्मिता सुतार यांनी दिली. पोलिस अधीक्षक बगाटे यांनी विविध कक्षाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद करत त्यांच्या कामकाजाचीही माहिती घेतली.
सायबर कक्षाबरोबरच आर्थिक गुन्हा शाखेची माहितीही त्यांना दिली. यावेळी या संपूर्ण इमारतीची पाहणी पोलिस अधीक्षक बगाटे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक गायकवाड यांनी केली. यावेळी या दोघांनीही आवश्यक असलेल्या सूचनाही केल्या.



