रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाकडे जुना २ हजार ७६३ ब्रास वाळू साठा आहे. शासनाच्या मार्गदर्शनानुसार हा वाळूसाठा घरकुलांच्या लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला प्रत्येकी पाच ब्रास वाळू मोफत देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते. शासनाकडून नवीन वाळू धोरणाबाबत मार्गदर्शन आले असून त्यानुसार जिल्ह्यात २२ वाळू गटांपैकी ४ गटांचा लिलाव झाला आहे. यातून ५ कोटी ३३ लाखांचा महसूल शासनाला मिळाला. उर्वरित १८ वाळू गटाच्या लिलावाबाबत २८ जुलैला निविदा उघडल्या जाणार आहेत. त्यामध्ये सर्व गटांचा लिलाव होण्याची शक्यता आहे. २२ ड्रेझर गटांची वाळू लिलाव प्रक्रिया ६ मेपासून सुरू झाली. यामध्ये जयगड गट १, दाभोळ २ आणि बाणकोट १ अशा चार गटांचा लिलाव झाला. यामध्ये ८८ हजार ४६९ ब्रास वाळू लिलावातून ५ कोटी ३३ लाखांचा महसूल शासनाला मिळाला; परंतु उर्वरित १८ गटांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यासाठी दि. २८ जुलैला फेरनिविदा उघडल्या जाणार आहेत.
युनेस्को जागतिक वारसा म्हणून सुवर्णदुर्ग किल्ला जाहीर झाला आहे. एक जिल्हा एक उत्पादन या (ODOP) या माध्यमातून जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त झाला आहे. आगामी नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत प्रभाग रचना जाहीर झाली असून, आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत १४ टक्के पाऊस कमी पडला आहे. पावसाळ्यात ३ कोटी २५ लाखांचे नुकसान असून अनुदान येताच वितरित केले जाणार आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे आंबा बागायतदारांच्या नुकसानासाठी १५ लाख रुपये मंजूर असून, निधी उपलब्ध होताच वितरण केले जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी सिंह यांनी सांगितले.



