Thursday, March 26, 2026

Latest Posts

मालगुंड गावचे गावकर यशवंत कळंबटे उर्फ आप्पा गावकर यांचे दुःखद निधन

मालगुंड : रत्नागिरी तालुक्यातील अतिशय मोठी वस्ती म्हणून नावाजलेल्या, मालगुंड गावांमध्ये मागील अनेक वर्ष सातत्याने आपल्या अनुभवाच्या माध्यमातून गावकीची जबाबदारी पार पाडत सर्वांच्या परिचयाचे आणि मालगुंड व मालगुंड परिसरात प्रतिष्ठित असलेले आणि मालगुंड गावातील १२ वाड्यांचे गावकर यशवंत कळंबटे उर्फ आप्पा गावकर यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने पहाटे चार वाजता दुःखद निधन झाले आहे.
मागील अनेक वर्षे सातत्याने गावकीच्या माध्यमातून गावांमध्ये शांतता आणि सौहार्दता प्रस्थापित करण्यामध्ये आप्पा गावकर यांचा प्रमुख वाटा होता. आपल्या प्रेमळ आणि विश्वासू स्वभावाने त्यांचा मालगुंड आणि मालगुंड पंचक्रोशीमध्ये दांडगा संपर्क होता. तसेच महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ. उदय सामंत यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात होते. त्यामुळे मालगुंड गावची ग्रामदेवता चंडिका मंदिराचा उत्सव, गावातील होळी, शिमगा, पालखी इत्यादी उत्सवात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्या माध्यमातून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत, मोठी जबाबदारी निभावत, आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. त्यासोबतच कोकणातील जाखडी नृत्य प्रकारात तुरेवाले शाहीर मंडळी त्यांच्या अनुभवामुळे त्यांना आजही गुरुस्थानी मानत असत. मुळात ते स्वतः उत्तम गायक, मृदंगवादक, नमन कलाकार म्हणून प्रसिद्ध होते.
मात्र मागील काही दिवसापासून अल्पशा आजाराने ते ग्रस्त होते. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार असून, त्यांच्या अचानक जाण्याने मालगुंड आणि मालगुंड पंचक्रोशीमध्ये दुःखद हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये आजच्या दिवशी मालगुंड आणि मालगुंड पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर, गावातील सामाजिक कार्यकर्ते, गावातील प्रमुख मंडळी, इत्यादी लोकांनी प्रत्यक्ष सहभाग घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच अनेक राजकीय नेते, विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी घरी जाऊन प्रत्यक्ष सांत्वन केले, तर अनेक जणांनी फोनद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्वानी उपस्थिती दर्शवत त्यांच्या कुटुंबातील दुःखात सहभागी होत श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांच्या कार्याच्या आठवणी काढत आज उपस्थित लोकांनी मृतात्म्याला श्रद्धांजली वाहून, आत्म्याला चिरशांती लाभो अशी प्रार्थना करून शेवटचा निरोप दिला.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.