रत्नागिरी : शहरातील मारूती मंदिर येथील स्वातंत्र्यवीर विद. दा. सावरकर नाट्यगृहसमोरील रस्त्यावर गुरूवारी आयोजित करण्यात आलेल्या आगळ्या वेगळ्या ‘हॅप्पी स्ट्रीट’वर लहानांबरोबरच मोठ्यांचेही चांगलेच मनोरंजन झाले.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसाचे आैचित्य साधून नगरसेवक निमेश नायर अॅंड फ्रेंड सर्कल यांच्या मार्फत यंदाही हॅप्पी स्ट्रीटचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहासमोरील रस्त्यावर ‘हॅप्पी स्ट्रीट’ हा अनोखा उपक्रम रत्नागिरीकरांसाठी आयोजित करण्यात आला होता. यावेळी हा मार्ग वाहतुकीसाठी काही काळ बंद ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे महत्वाचे वैशिष्ट्य होते, ते सर्वांसाठी खुले ठेवण्यात आलेले विविध कलांसाठीचे व्यासपीठ.
त्यामुळे लहानांच्या किलबिलाटात सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा आनंद मोठयांनीही घेतला. गाणी, डान्स याबरोबरच विविध कलांचे सादरीकरणही करण्यात आले.
यात १४ पेक्षा अधिक विविध मनोरंजक खेळांचा समावेश होता. त्यासाठी बक्षीसेही देण्यात आली. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे टॅट्यू. मुलांबरोबरच मोठ्यांनीही यात सहभाग घेतला.
यावेळी लहान मुलांसाठी खास ’कीड्स झोन’ तयार करण्यात आला होता. यात ट्रॅम्पोलीन, मिी माऊस, बाऊन्सर आणि गंमतजंमत करणारा जोकर मुलांना हसवत होता. या कार्यक्रमांचा आनंद सर्वांनीच मनमुराद घेतला.



