रत्नागिरी: वर्षअखेरीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करून तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान तीन जण मद्यप्राशन करून गाडी चालविताना सापडले. त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नाकाबंदी ठेवण्यात आल्या होत्या. वर्ष अखेरचा जल्लोष आणि नवीन वर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पार्ट्यांचे तसेच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती. पोलिसांकडून शहरातील भाट्ये, परटवणे, साळवी स्टॉप, मारुती मंदिर, भुते नाका या परिसरात नाकाबंदी केली होती. या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात येत होती. त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यावर कोणतीही दुर्घटना नये यासाठी मांडवी, भाट्ये, कुर्ली समुद्रकिनारी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान २०८ वाहनांची तपासणी केली. ४४० व्यक्तींची तपासणी केली. यादरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत ३१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मद्यप्राशन करून गाडी चालवताना तिघांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ३७ हजारांचा दंड वसूल केला आहे.



