रत्नागिरी: जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या ईव्हीएम मशिन्सच्या प्रथम स्तरीय तपासणीत (FLC) मोठ्या प्रमाणावर तांत्रिक बिघाड समोर आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक अमोल श्रीनाथ यांनी शासकीय धान्य गोदामातील तपासणी प्रक्रियेदरम्यान ईव्हीएमच्या कंट्रोल युनिटमध्ये तांत्रिक बिघाड, बॅलेट युनिटची बटणे न चालणे आणि मेमरी चेंज एरर यांसारख्या गंभीर त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत उपजिल्हाधिकारी विश्वजीत गाताडे यांनी अधिकृत पत्राद्वारे वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासणीचा मुख्य उद्देशच नादुरुस्त मशिन्स शोधून त्या बाजूला करणे हा होता. या प्रक्रियेत १२७ कंट्रोल युनिट (CU) आणि ५६९ बॅलेट युनिट (BU) नादुरुस्त असल्याचे आढळल्याने त्या स्वतंत्र ठेवण्यात आल्या असून त्या निवडणुकीसाठी वापरल्या जाणार नाहीत. सद्यस्थितीत १६५२ कंट्रोल युनिट आणि ३५४४ बॅलेट युनिट तपासणीत योग्य आढळले असून, संभाव्य टंचाई लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाकडे वाढीव ५०० कंट्रोल युनिट आणि ८०० बॅलेट युनिटची मागणी करण्यात आली आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने आता सर्व ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले असून संपूर्ण तपासणी प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जात आहे. तसेच, तालुकानिहाय मशिन्स पाठवताना त्या पूर्णपणे सील करूनच पाठवण्यात येतील, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.



