Saturday, February 14, 2026

Latest Posts

धर्म, जात, वंश न पाहता निर्भयपणे मतदान करा- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव

रत्नागिरी, दि. 25 (जिमाका): सर्व समावेशक असा मतदानाचा अधिकार मिळाला आहे. धर्म, जात, वंश न पाहता निर्भयपणे मतदान करा. तुम्ही देशाचे भवितव्य आहात, कर्तव्य समजून मतदान करा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी केले.
    जिल्हाधिकारी कार्यालय, उपजिल्हा निवडणूक कार्यालय,  उपविभागीय कार्यालय व तहसीलदार कार्यालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ आज येथील पटवर्धन हायस्कूल विजू नाटेकर ज्युनिअर कॉलेज येथे झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी मनुज जिंदल हे होते.
   सुरुवातीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. जाधव व जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर मतदारांना संदेश देवून फलकावर स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्याल आली. हवेत फुगे सोडण्यात आले.
   मार्गदर्शन करताना न्यायाधीश श्री. जाधव म्हणाले, शालेय अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र विषयात निवडणूक, मतदान प्रक्रियेविषयी आपण माहिती घेतली असेल. जगात एकमेव ‘स्वत: प्रत अर्पण करीत आहोत ’असा उल्लेख असणारे भारताचे संविधान आहे. १९२० पर्यंत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  संविधानाद्वारे सर्वांना समान, सर्वसमावेशक असा मतदानाचा अधिकार मिळाला. तुम्हाला सुविधा देवू शकेल, आपल्या परिसराचा, आपल्या राज्याचा विकास करु शकेल, असा लोकप्रतिनिधी या मतदानाने तुम्ही निवडू शकता. त्यासाठी निर्भयपणे मतदान करा आणि इतरांनाही मतदान करण्याविषयी सांगा, आसेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी  श्री. जिंदल म्हणाले, १५ ऑगस्ट १९४७ ला आपला देश स्वतंत्र झाला. पण, त्यावेळी मतदानाचा अधिकार नव्हता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. २६ जानेवारी १९५० पासून ते अंमलात आले. आपला देश लोकतंत्र म्हणून घोषित झाला. १९५१ ला देशाात पहिली निवडणूक झाली. लोकशाहीत निवडणुकीचा अधिकार ही अभिमानाची गोष्ट आहे. आपण आपला आवाज मतदानाद्वारे पोहचवू शकतो. त्यासाठी अत्यंत गंभीरपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे. ८० टक्के, ९० टक्के अगदी १०० टक्के मतदान करण्यावर भर द्यावा, असेही ते म्हणाले.
   यावेळी राष्ट्रीय मतदार दिवसाची प्रतिज्ञा घेण्यात आली.
  अपर पोलीस अधीक्षक बी.  बी. महामुनी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. प्र उपजिल्हा निवडणूक अधिकारी आसावरी संसारे, आस्था फौंडेशनच्या सुरेखा पाथरे यांनीही मार्गदर्शन केले.‍
      निवडणूक कामकाजात उत्कृष्ट कामकाज करणारे अधिकारी, कर्मचारी, शाळा तसेच रांगोळी व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
    कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी केले. कार्यक्रमास भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह दिनेश रायकर, प्राचार्य जानकी घाटविलकर, तहसिलदार राजाराम म्हात्रे, नायब तहसिलदार दीपक चव्हाण यांच्यासह शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.